२०-३० जागांवर उमेदवार देणार, जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत केली घोषणा; रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:24 AM2024-11-04T07:24:42+5:302024-11-04T07:25:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024: दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
वडीगोद्री (जि.जालना) : दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. एका जातीवर निवडणूक लढणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोणीही हट्ट करून मतदारसंघ वाढवू नये. दिलेले उमेदवार विजयी करण्यासाठी काम करावे, आरक्षित जागेवर पाठिंबा द्यावा आणि इतर ठिकाणी पाडापाडी करावी, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. जरांगे पाटील यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. दिवसभरात २५ मतदारसंघांवर चर्चा झाली.
या जागांवर चर्चा सुरू
- पाथर्डी व शेवगाव, करमाळा, वसमत, हिंगोली, कन्नड, पाथरी, गंगाखेड, लोहा, कंधार, तुळजापूर, भूम-परंडा, कोपरगाव, नेवासा, पाचोरा, माढा, धुळे, निफाड आणि नांदगाव या विधानसभा मतदारसंघांबाबत रात्री उशिरापर्यंत जरांगे यांची चर्चा सुरू होती.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा अंतिम दिवस आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवार अंतिम केले जातील. २० ते ३० जागा लढविल्या जाणार असून, त्यात वाढ होईल किंवा कमीही होतील, असेही जरांगे म्हणाले.
अन् मनाेज जरांगे यांना झाले अश्रू अनावर...
मराठा समाजावर सरकारने खूप अन्याय केला आहे. हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावून घेतला आहे. आम्हाला राजकारणाची हौस नाही. परंतु, त्यांनी आम्हाला तिथे ओढलं आहे. आम्ही आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार असून, समाजाचे बळ वाढावे म्हणून कुटुंबाला दूर ठेवून आपण लढा देत आहोत, असे सांगताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.
मराठा-मुस्लीम-दलित ‘एमएमडी’ समीकरण
- जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित समाज असे समीकरण तयार करत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे.
- दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्याशी मनोज जरांगे यांनी बंदद्वार प्रदीर्घ चर्चा केली होती.
- त्यानंतर या तिघांनीही पत्रपरिषदेत ‘एमएमडी’ समीकरणाची मोट बांधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
मराठा समाज, मुस्लीम समाज आणि दलित समाजाची ताकद जिथे आहे, तेथे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा, मुस्लीम, दलित, गरजू ओबींसींसह १८ पगड जातींचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मोजक्याच जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. ते उमेदवार जिंकून आणायचे आणि इतर ठिकाणी पाडापाडी करायची, असे जरांगे म्हणाले.