मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; छगन भुजबळांची मवाळ भूमिका? म्हणाले, "जो निर्णय घेतला, त्याचं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:21 PM2024-11-04T12:21:14+5:302024-11-04T12:22:43+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Manoj Jarange patil's withdrawal from elections; Chhagan Bhujbal's soft role? Said, "The decision taken, that..." | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; छगन भुजबळांची मवाळ भूमिका? म्हणाले, "जो निर्णय घेतला, त्याचं..."

मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; छगन भुजबळांची मवाळ भूमिका? म्हणाले, "जो निर्णय घेतला, त्याचं..."

Maharashtra Assembly Election 2024 :नाशिक : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचे काही सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधकांनी स्वागत केले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी चक्क मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला, त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. मराठा समाजाचे 60 ते 70 टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे.

दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार? सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे, असा त्याचा अर्थ आहे. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात. 

याचबरोबर, मनोज जरांगे यांनी माघार जरी घेतली असली तर आंदोलन सुरूच राहणार असेही म्हटले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले, मराठा आंदोलन हा भाग वेगळा आहे. मी समता परिषदेचे काम करतो. सामाजिक काम वेगळं आहे.समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत नाही. आमच्या सामाजिक संस्थेचा सदस्य आहे म्हणून मतदान करा, असे होत नाही. तसेच, त्यांचे काम ते करतील त्रुटी सांगत राहतील.महाराष्ट्रातील निवडणूका मोकळ्या पद्धतीने होतील. सामाजिक सलोखा राहील असे वाटते, त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे उमेदवार मोकळेपणाने भूमिका मांडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Manoj Jarange patil's withdrawal from elections; Chhagan Bhujbal's soft role? Said, "The decision taken, that..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.