नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:16 PM2024-10-31T18:16:46+5:302024-10-31T18:18:02+5:30
रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले.
जालना - दलित, मुस्लीम अन् मराठा एकत्र आलाय हे फायनल...ही आनंदाची वार्ता मराठ्यांमध्ये गेली. मुस्लीम आणि दलित एकत्र आहेत, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. आता मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र झाल्याने कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. नेत्याला आणि पक्षाला मतदान करायचं नाही. आमचा शिक्का चालणारच...तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे, शांततेत मतदान करायचे आणि माघारी यायचे. ७५ वर्षातून ही संधी मिळाली ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाला केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका जातीवर राज्यात कुणीही निवडणूक जिंकू शकत नाही, मग मराठा असो वा कुणीही..राजकारण ही सोपी गोष्ट नाही. समाजकारणात ठीक आहे. एखादा समुदाय जमवंणं, मागणी करणं हे वेगळे. आता राजकीय प्रवास करायचा असला तर सगळ्या जातीधर्मांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. काही जुळवून देत नव्हते. फूट पाडायचा प्रयत्न करत होते. शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलोय. आम्हाला आरक्षण देत नाही. या लोकांना मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय. कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत. आजच नाही पहिल्यापासून आम्हाला हे जगू देत नाही. नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठे करणार नाही. ट्रोलिंगचा फरक नाही. मराठ्यांची पोरं कच्ची नाहीत, मुस्लीम आणि दलित पोरंही आता रपारप सुरू होणार...तुम्ही जे करतायेत तेच आम्ही करतो. निवडणुकीला तुम्हाला अधिकार आहे उभं राहण्याचा तसा आम्हालाही आहे. कोण कुणाला हरवतं ते बघायचं असं चॅलेंजही मनोज जरांगे पाटलांनी महायुती आणि महाविकास आघाडीला दिले.
तसेच एक शिक्का चालवायचा. आपल्या जातीची पोरं वाचवायची. एकमेकांच्या अंगावर जायचं नाही. जर शिव्या दिल्या तर लहान भावाने दिल्या समजून पुढे जायचं. दलितांनाही एक शिक्का चालू द्या. वाद घालत बसायचं नाही. तुम्ही एकदिलाने एकत्र राहिला तर ७० वर्षात बघितलेले स्वप्न आता साकार होणार. ४ तारखेपर्यंत मराठा बांधवांना विनंती आहे, कुणीही अंतरवालीकडे येऊ नका. मला मोकळा वेळ द्या. इच्छुकांनी जास्त ताणू नका, एक इच्छुक उभा करायचा आणि इतरांना अनेक संधी आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद, मार्केट, महामंडळे सगळे पुढे आहे. २-२ मंत्री करू, ७-८ उपमुख्यमंत्री करू, मुस्लीम, दलित, धनगर, मराठा, लिंगायत, ओबीसी सर्वांचा उपमुख्यमंत्री करूया. रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या. आजपासून सावध राहा. मुस्लीम, मराठा आणि दलित एकत्र आल्याने घराघरात मराठ्यांना आनंद आहे. आमचं आरक्षण हिसकवणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्यावर गोळ्या घालणाऱ्यांना सुट्टी नाही असा इशारा जरांगेंनी दिला.
दरम्यान, मला आधी १०० एकर सभेला पुरत नव्हते, आता ५०० एकर लागेल, सगळं लफडं एकत्र, सगळी कामं बंद जिथं सभा असेल तिथे सर्वांनी यायचं. एवढी शक्ती दाखवायची. पहिल्याच सभेत अख्खा महाराष्ट्र जळमळून गेला पाहिजे. पहिली सभा जिथं असेल तिथल्या जिल्ह्यातील एकही मराठा, दलित, मुस्लीम घरी नको. जातीवंत मुस्लीम, जातीवंत दलित असाल तर सभेला यायचं. १०० किमी वाहतूक कोंडी झाली पाहिजे. तुफान गर्दी करायची असं आवाहन जरांगेंनी केले आहे.