चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:21 PM2024-10-30T17:21:48+5:302024-10-30T17:31:21+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीतही मनसेनं भाजपाला पाठिंबा दिला. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. 

Maharashtra Assembly Election 2024 - Meeting of MNS President Raj Thackeray and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

मुंबई - राज्यात विधानसभा रणधुमाळी सुरू आहे. त्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच एका खासगी कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचे फोटो देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.

गेल्या काही वर्षापासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून झालेल्या वादातून भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलेत. त्यानंतर भाजपा आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक निर्माण झाली. जून २०२२ साली महायुती सरकारच्या पाठिंब्यासाठी मनसेच्या एकमेव आमदाराने सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही मनसेनं भाजपाला पाठिंबा दिला. इतकेच नाही तर लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. 

माहिममध्ये भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा

माहिम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. या जागेवर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यात माहिम जागेवरून देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भाजपाचं मत आहे. मुख्यमंत्री शिंदेंचीही तीच इच्छा आहे. मात्र तिथले उमेदवार ऐकण्यास तयार नाहीत असं विधान करत देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरेंच्या पाठिंब्यावर मोठं विधान केले आहे.

मनसे-भाजपा युतीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर मनसे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की महायुतीला असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मला काम महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी निश्चित नाही. शिवसेनेत होतो, तेव्हापासून दुसरा कोणता पक्ष माझ्या आयुष्यात आला असेल, तर तो म्हणजे भाजपा आहे. प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण आडवाणी असतील, यांचे घरी येणे जाणे होते, यांच्याशीच माझा संबंध आला. माझा कधीही काँग्रेस, एनसीपी यांच्याशी तेवढा संबंध आलाच नाही. सर्व पक्षातील नेत्यांसोबत गाठी-भेटी हा भाग निराळा आहे. परंतु, भाजपाप्रमाणे कधी अन्य संबंध आला नाही असं त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक माणसांशी माझा जुना संबंध आहे. ते घरी येत होते, भेटी-गाठी होत होत्या. यंदाच्या निवडणुकीत मनसे सत्तेत असेल. सोपे नाही ते. मला वाटतेय, त्याप्रमाणे भाजपाचा मुख्यमंत्री होईल. आमच्या साथीने होईल असं भाकीत राज ठाकरेंनी व्यक्त केले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Meeting of MNS President Raj Thackeray and Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.