मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ

By दीपक भातुसे | Published: November 2, 2024 06:09 AM2024-11-02T06:09:27+5:302024-11-02T06:10:47+5:30

महायुतीच्या मंत्र्यांनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्राची तुलना केल्यानंतर कोणत्या मंत्र्यांच्या संपत्तीत किती टक्क्यांनी वाढ झाली, हे लक्षात येते.

Maharashtra Assembly Election 2024 : Millions of crores of wealth of ministers, huge increase in wealth of all ministers except minister Lodha in five years | मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ

मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ

मुंबई : महायुती सरकारमधील २७ मंत्री यावेळी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात आहेत. या मंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्रानुसार मुंबईतील सर्वांत मोठे बिल्डर असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत घट झाल्याचे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्र्यांसह इतर २७ मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या मंत्र्यांनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्राची तुलना केल्यानंतर कोणत्या मंत्र्यांच्या संपत्तीत किती टक्क्यांनी वाढ झाली, हे लक्षात येते.

- अदिती तटकरे यांच्या संपत्तीत सर्वांत जास्त ७७१.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे केवळ ३९ लाख रुपयांची संपत्ती होती. त्या खालोखाल संजय राठोड २१९.८ टक्के, संजय बनसोडे १४३.८ टक्क्यांनी संपत्ती वाढली आहे. 

सर्वांत श्रीमंत मंत्री कोण? 
तानाजी सावंत हे सर्वांत श्रीमंत मंत्री असून, त्यांची संपत्ती २१८.१ कोटी रुपये इतकी आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीत पाच वर्षांत घट झाली असली, तरी सर्वांत श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानी आहेत. २०१९ साली लोढांची संपती १५८.२ कोटी रुपये होती, पाच वर्षांत त्यात ११ टक्के घट होऊन ती १४०.८ कोटी रुपये इतकी झाली आहे. वाढत्या कर्जामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचे प्रतिज्ञापत्रावरून 
दिसून येते.

- मंत्री अदिती तटकरे यांनी रोहा येथे १ कोटी रुपये किमतीची १२ एकरपेक्षा जास्त शेतजमीन आणि २१ लाख रुपये किमतीचा ७५,८२७ चौरस फुटांचा बिगर कृषी भूखंड विकत घेतल्याने त्यांच्या निव्वळ संपत्तीत पाच वर्षांत वाढ झाल्याचे दिसते. 

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत ५६ टक्के, तर अजित पवार यांच्या संपत्तीत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
- ईडीच्या कारवाईला सामोरे गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांची संपत्ती पाच वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढली आहे. 
-  कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  
- मंत्री विजयकुमार गावित यांच्याविरोधात मागील निवडणुकीत नऊ खटले प्रलंबित होते, ते आता शून्यावर आले आहेत. तर त्यांची एकूण संपत्ती १२ टक्क्यांनी वाढली आहे. 
- मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुटुंबाच्या निव्वळ मालमत्तेतही लक्षणीय वाढ झाली, ती ७.१ कोटींवरून १५.५ कोटींवर गेली असून, त्यांच्या संपत्तीमध्ये दीड लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर दाखविण्यात आले आहे. 

- संजय राठोड यांनी २०२३ मध्ये प्रभादेवी येथे १३ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत वाढ झाली, तर त्यांच्या पत्नीने डिसेंबर २०१९ मध्ये नागपूर येथे ३७,४५२ चौरस फुटाची व्यापारी मालमत्ता ११ कोटी रुपयांना विकत घेतली. राठोड यांच्यावरील कर्ज २.२ कोटी रुपयांवरून २४.४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे दिसून येते.
- धनंजय मुंडे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये मलबार येथे १० कोटी रुपये किमतीचा २,१५१ चौरस फुटांचा फ्लॅट विकत घेतला तसेच पुणे येथे २०२२ मध्ये ९३० चौ. फुटांचा १.१ कोटी रुपये किमतीचा फ्लॅट विकत घेतला. परिणामी, मुंडे यांच्या कौटुंबिक संपत्तीत मागील पाच वर्षांत ८१ टक्के वाढ झाली आहे.

  मंत्री    २०१९ ची संपत्ती    २०२४ ची संपत्ती    वाढ    (आकडे कोटीत)
एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री    ७.८२    १३    ६६.२% 
देवेंद्र फडणवीस - उपमुख्यमंत्री    ८.०९    १२.६    ५६.३%
अजित पवार - उपमुख्यमंत्री    ७१.७    १०३.३    ४४%
छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा मंत्री    २६.४    ३०.९    १७.३%
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल मंत्री    २४.७    ३४.१    ३७.९%
सुधीर मुनगंटीवार - वनमंत्री    ९.८    १२.४    २६.३%
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री    ५.५७    ८.७२    ५६.४%
विजयकुमार गावित - आदिवासी विकास मंत्री    २५.५    २८.६    १२.२%
दिलीप वळसे पाटील - सहकार मंत्री    ४.५३    ५.५८    २३%
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षणमंत्री    ९.६६    १२.९    ३३.५%
गिरीश महाजन - ग्रामविकास मंत्री    २४.९    ३८.२    ५३%
धनंजय मुंडे - कृषिमंत्री    २१.१    ४८.३    ८१.३%
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री    ४.७    ८.२९    ७५.४%
दादा भुसे - एमएसआरडीसी मंत्री    १०.२    १८.१    ७७.२%
संजय राठोड - मृद व जलसंधारण मंत्री    ५.८६    १८.७    २१९.८%
सुरेश खाडे - कामगार मंत्री    ४.९६    ५.४४    ९.५%
उदय सामंत - उद्योगमंत्री    ३.०७    ३.८२    २४.४%
तानाजी सावंत - आरोग्यमंत्री    १९४.५    २१८.१    १२.१%
रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम मंत्री    ७.११    १५.४    ११७.७%
अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक मंत्री    १९.१    २६.८    ४०.३%
दीपक केसरकर - शिक्षणमंत्री    ५९.७    ९८.५    ६४.९%
अतुल सावे - गृहनिर्माण मंत्री    १९.९    ३३.६    ६९.२%
शंभूराज देसाई - उत्पादन शुल्क मंत्री    १३.२    १४.१    ६.६८%
अनिल पाटील - मदत व पुनर्वसन मंत्री    ४.९    ७.११    ४३.२%
संजय बनसोडे - क्रीडामंत्री    २.०३    ४.९६    १४३.८%
मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास मंत्री    १५८.२    १४०.८    (उणे) -११%
अदिती तटकरे - महिला व बालकल्याण मंत्री    ०.३९    ३.४१    ७७१.८%

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Millions of crores of wealth of ministers, huge increase in wealth of all ministers except minister Lodha in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.