एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 12:29 PM2024-11-02T12:29:49+5:302024-11-02T12:55:33+5:30

कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये यासाठी नेत्यांचे काम असते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यानंतर मनसेनं पलटवार केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 - MNS challenges Eknath Shinde Shiv Sena from Mahim Constituency | एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...

मुंबई - माहिम मतदारसंघात यंदा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे तर उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु सदा सरवणकर हे माघार घेण्यास तयार नव्हते. त्यात कार्यकर्त्यांना खचू न देणे ही नेत्याची जबाबदारी असते असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यामुळे मनसेकडूनही त्यावर पलटवार केला आहे.

मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, माहिम मतदारसंघात आम्ही त्यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव घेऊन गेलो नाही की या जागेवर तुम्ही माघार घ्या. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेच आम्ही विधानसभेला स्वबळावर लढणार हे जाहीर केले होते. त्यामुळे माहिम जागेबाबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त जेव्हा तुमचा मुलगा लोकसभेला उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली होती. आज आमचे राजू पाटील तिथे उभे आहेत. तुमच्याकडे थोडीही माणुसकी नाही तुम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करता. तुमच्या मुलासाठी राजू पाटील आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा नसतानाही त्यांनी काम केले. त्याची परतफेड करणे ही भावना तुमच्याकडे नाहीच, ते तुमच्या मनात मेलेले आहे. राज ठाकरेंचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. नातेसंबंध ते जपतात. वरळीतही मागील वेळी मनसेनं उमेदवार दिला नव्हता. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हे संकुचित विचारांचे लोक आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली.

तसेच अंबरनाथमध्ये जे घडलं, ते म्हणजे लोकसभेला ज्याप्रकारे संकेत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेबाबतीत दिले होते ते त्यांनी पाळले नाहीत. राजू पाटील आणि आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची श्रीकांत शिंदेंचा प्रचार करण्याची इच्छा नव्हती. केवळ राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवेदावे, मतभेद विसरून त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता. आता विधानसभेला तिथे त्याची परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे अशी भूमिका घेत असतील तर ते आश्चर्यकारक आहे असं विधान मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

लोकसभा निवडणुकीच्या वेळा आम्ही एकत्र होतो. माझी राज ठाकरेंशी चर्चादेखील झाली होती. मी त्यांना तेव्हाच विचारलं होतं की विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असेल? त्यावेळी ते मला म्हणाले होते की, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ दे. त्यानंतर आपण बोलूया, पण त्यांनी थेट उमेदवार देण्यास सुरुवात केली. (माहिममध्ये जेथून अमित ठाकरे लढणार आहेत,) तेथून आमचाही आमदार दोन-तीन टर्मपासून जिंकत आला आहे. सदा सरवणकर हे आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ता आहेत. ते आमचे आमदार आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याबाबत खूपच आक्रमक आहेत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये हे देखील नेत्यांचे काम असते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - MNS challenges Eknath Shinde Shiv Sena from Mahim Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.