उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:49 PM2024-11-15T15:49:47+5:302024-11-15T15:51:17+5:30
नाशिकमधील मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
नाशिक - ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक मुर्तडक हे राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते.
आज नाशिक येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेत अशोक मुर्तडक यांच्यासह मनसेतील अनेक प्रमुख पदाधिकारी ठाकरे गटात शिवबंधन बांधणार आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघात मुर्तडक निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र त्यांच्या ऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष ते महापौर म्हणून कार्यरत होते. मनसेच्या सत्ताकाळात महौपार म्हणून त्यांनी अनेक विकासकामे शहरात केली.
विशेष म्हणजे शनिवारी १६ नोव्हेंबरला राज ठाकरे यांची नाशिकमधील सातपूर आणि सिडको येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच राज ठाकरेंना धक्का देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा. याठिकाणी मनसेचे ३ आमदार निवडून आले होते. त्याशिवाय मनसेची पहिली सत्ता नाशिक महापालिकेत आली होती. नाशिकमध्ये सध्या मनसेकडून दिनकर पाटील आणि प्रसाद सानप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु नाशिक मध्य मतदारसंघातून शेवटच्या दिवशी मनसेने उमेदवाराला माघार घ्यायला लावली होती. त्यावरून बरीच राजकीय चर्चा शहरात सुरू होती.
नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात अंकुश पवार आणि प्रसाद सानप यांना मनसेने उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. याठिकाणी अंकुश पवार यांनी पक्षाच्या आदेशानंतर माघार घेतली. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपा आणि मनसे एकाच भूमिकेतून राजकीय पटलावर कामकाज करीत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळाल्याचं भाजपा कार्यकर्त्यांनी म्हटलं होते.