मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:04 PM2024-10-31T19:04:08+5:302024-10-31T19:04:51+5:30
तुम्ही भाजपासोबत होता तेव्हा महाराष्ट्र द्रोह नव्हता आता तुम्हाला शरद पवारांच्या मांडीवर बसून अक्कल आली का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबई - जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोट तुमच्याकडे असतात. आमचे नगरसेवक चोरताना तुम्हाला लाज वाटली नाही का..स्वत:च्या भावाचे नगरसेवक चोरले. तेव्हा महाराष्ट्रद्रोह नव्हता का...मराठी माणसांसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना लाज नावाची गोष्ट तुमच्याकडे शिल्लक आहे का याचे संजय राऊतांनी उत्तर द्यावे असा घणाघात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, तुम्ही स्वत:चे आमदार हरवण्यासाठी पवारांसोबत गेला की जिंकवण्यासाठी गेलात?, स्वत: शेण खाल्लेले असताना दुसऱ्याचा तोंडाचा वास घ्यायची सवय संजय राऊतांना लागलीय. उबाठाचा मुख्यमंत्री होत नाही हे नक्की, दिल्लीला सोनिया गांधींचे पाय धरले तरी, नाना पटोलेंचे भांडण केले तरी उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने समोर केला नाही. १२५ जागा लढवत होता, ते आता ८० वर आलात. त्यामुळे तुम्ही स्वत:कडे बघा आणि नंतर मनसेवर बोलावे असं त्यांनी सांगितले.
तसेच मनसेचे सूर कुणाशी जुळले तर त्यांना मूळव्याध होतो हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. या लोकांचे भाजपाशी सूर जुळले, काँग्रेसशी सूर जुळले तर चांगले, शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले तर ते चांगले. या लोकांनी वाट्टेल ते करावे पण दुसऱ्याने काही बोलले, केले तर ते सगळे महाराष्ट्रद्रोही...२०१४ मध्ये तुम्ही मोदींसोबत होता तेव्हा महाराष्ट्रद्रोही नव्हता का...२०१४ ची विधानसभा वेगळी लढवली त्यानंतर पुन्हा भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा तुम्ही महाराष्ट्रद्रोही नव्हता का, मोदी-शाह यांना शिव्या घातल्या त्यानंतर २०१९ ला त्यांच्यासोबत जाऊन बसला तेव्हा तुम्ही महाराष्ट्रद्रोही नव्हता का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, २०१९ ची विधानसभा निवडणूक तुम्ही भाजपासोबत लढवली तेव्हा महाराष्ट्र द्रोह नव्हता का...निकालानंतर तुम्ही शरद पवारांच्या मांडीवर बसला तेव्हा तुम्हाला कुठून अक्कल आली..? महाराष्ट्राच्या कोणत्या भल्याचा विचार तुम्ही केला होता हे जनतेला सांगा. सरड्यासारखे रंग बदलणारे हे लोक आहेत म्हणून ही शिवसेना फुटली. तुम्ही भाजपासोबत होता तेव्हा १०६ हुताम्यांच्या भावना दुखावल्या नाहीत आता तुम्ही सोडले म्हणून लगेच दुखावणार...नेमकं काय ते सांगावे. तुम्ही तुमचे सूर कपाटात बंद करून ठेवले आणि शरद पवारांशी जुळवले असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.