"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:30 PM2024-11-13T16:30:51+5:302024-11-13T16:31:47+5:30
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे.
मुंबई - कुटुंबप्रमुख असण्याचा हक्क फक्त शब्दांत नाही, कृतीतही दिसावा. आम्हाला कुटुंबातील उणेदुणे काढायची नाहीत परंतु उद्धव ठाकरे तुम्ही काल मुलाखतीत म्हणालात ना? की मागच्या शस्त्रक्रियेवेळी राज आला होता. यावेळी आला नाही. त्यांच्या येण्याची अपेक्षा ठेवता ना? मग खाली दिलेली यादी वाचाच "कुटुंबप्रमुख" असं सांगत माहीमचे मनसे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत.
यशवंत किल्लेदार यांनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटलंय की, अमित ठाकरे आजारी गंभीर असताना राज ठाकरेंचे नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला आजारपण आठवले नाही. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंची कन्या उर्वशीचा अपघात झाला? तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, कोविडमध्ये तुमची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मातोश्रीवर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत. कारण काय? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यावर तुमच्याकडून एकही फोन नाही. भेट नाही, काय झालं? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, शर्मिला वहिनींच्या चेहऱ्यावर एका अपघाताने प्रचंड मोठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख? असा सवाल त्यांनी विचारले आहेत.
त्याशिवाय आदित्य निवडून आले. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले पण ज्या काकांनी उमेदवार दिला नाही. त्या काकांना धन्यवाद बोलायला आजवर वेळ मिळाला नाही. आदित्यला शिकवण देताना. कुठे होता तुमच्यातल्या कुटुंबप्रमुख?, २००५ च्या महापुरात बाळासाहेब ठाकरेंना एकटे सोडून सहकुटुंब तुम्ही हॉटेलात राहायला गेलात. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना एकटं पडू न देता त्यांना आपल्या घरी घेऊन आले ते राज ठाकरे. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंसोबत घाणेरडं राजकारण केलं गेलं. ह्या दुःखद प्रसंगात राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली गेली. तेव्हा पुढे येऊन हे सगळं का थांबवलं नाही? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंचा एक साधा विनोद सहन होत नसेल तर राजकारण सोडून घरी बसा. राज ठाकरेंबाबत बोलाल तर तशीच उत्तरे मिळणार असा पलटवार मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.
दरम्यान, मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यात आतलेही आहेत, बाहेरचेही आहेत. सगळे जणच प्रयत्न करताहेत. माझ्याकडून मी अलर्ट असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येतात. हा असे बोलला.. तो असे म्हणाला. अशा गोष्टी मला कळतात. पण, असल्या गोष्टी मी ऐकत नाही. दोघे एकत्र व्हावे असे वाटणे वेगळे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरून त्यांच्याकडून काही लोक काही तरी बोलत असतात, सांगत असतात. करत असतात. माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ वाटत नाही. यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल असं विधान राज ठाकरेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.