माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:39 AM2024-10-29T05:39:42+5:302024-10-29T06:55:23+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धवसेनेच्या उमेदवाराची छ.संभाजीनगरमध्ये माघार, लगेच दिला दुसरा पर्याय

Maharashtra Assembly Election 2024 : Monday was filled with dramatic events; Congress has changed its candidate in Kolhapur North | माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

मुंबई : सोमवारचा दिवस राज्याच्या राजकारणात नाट्यमय घटनांचा अनुभव देणारा ठरला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस  असून नेत्यांची लगबग आणि धावाधाव बघायला मिळणार आहे. बारामतीत उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावूक झाले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात उद्धव सेनेच्या उमेदवाराने माघार घेतली, दोन तासात नवीन उमेदवार दिला गेला. काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्याऐवजी शरद पवार गटाने पुत्र सलिल यांना उमेदवारी दिली. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलत मधुरिमा छत्रपती यांना संधी दिली. शिंदेसेनेने उमेदवारी नाकारलेले श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या पत्नीने संतापाला वाट मोकळी करून दिली. लातूर शहरात एका अपक्ष उमेदवाराने स्वत:ची ‘अंत्ययात्रा’ काढली.

...अन् अजित पवारांचे डाेळे पाणावले
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी भावूक होत लोकसभेला माझं चुकलं अशी कबुली देत ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा’, अशी साद मतदारांना घातली. आई सांगत होती, माझ्या ‘दादा’च्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका...असे सांगताना त्यांनी आवंढा गिळत मनाला सावरले.

औरंगाबाद ‘मध्य’तून तनवाणींची माघार
औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. उद्धवसेनेने तडकाफडकी बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी घोषित केली. 

पत्ता कट झाल्याने आमदार वनगा ढसाढसा रडले 
उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने पालघरचे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांपुढे ओक्साबोक्सी रडतच मनातील संतापाला वाट मोकळी करुन दिली. प्लॅनिंग करून माझा घात केला. यांना प्रामाणिक काम करणारा माणूस नको, तर लबाडी करणारा, हप्ते गोळा करणारा माणूस हवा होता, पण मी ते करू शकणार नसल्यानेच माझा पत्ता कट केला, असे त्यांनी रडत रडतच सांगितले.
पालघर, बोईसर आणि डहाणू या तीन ठिकाणी महायुतीने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आपला पत्ता कट झाल्याने पालघरचे आ. वनगा रविवारपासून नैराश्यामध्ये असून सारखे आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत असल्याची माहिती वनगा यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत दिली.

स्वत:ची काढली अंत्ययात्रा
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लालासाहेब शेख यांनी अर्ज दाखल करताना सोमवारी स्वतःची अंत्ययात्रा काढून काँग्रेस आणि भाजपला विरोध दर्शविला. उमेदवार लालासाहेब शेख म्हणाले, मी जनतेसमोर समस्या मांडत आहे. माझा मोर्चा काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात आहे. आमदार अमित देशमुख आमची मते घेतात; पण आमच्यासाठी काम करत नाहीत. मुस्लिमांच्या प्रश्नांवर त्यांचे मौन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Monday was filled with dramatic events; Congress has changed its candidate in Kolhapur North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.