ते ठाकरे तर मी राऊत, आम्ही सुसंस्कृत, चमचेगिरी करणारे नाही; राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 10:04 AM2024-11-09T10:04:05+5:302024-11-09T10:05:34+5:30
राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार करत मला कोणती भाषा कुठे वापरायची, काय लिहायचं याचे धडे घेण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं.
मुंबई - भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्राची लूट करतायेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हेसुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्याला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. विक्रोळीच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनीसंजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शुद्ध तुपातली भाषा कुणासाठी वापरायची महाराष्ट्राच्या शत्रूसाठी..? आम्ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही. राज ठाकरे इथं येऊन काय बोलले त्यात मला जायचं नाही. भाजपाचं स्क्रिप्ट आहे. फडणवीसांनी दिलेले असेल तर बोलावे लागते नाहीतर ईडीची तलवार आहे. आम्ही अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेत राजकारण केले आहे. माझं बरेच आयुष्य बाळासाहेब ठाकरेंसोबत गेले आहे, ते राज ठाकरेंनाही माहिती आहे. त्यामुळे कुणाला कोणती भाषा वापरायची, काय लिहायचं याची मला धडे घेण्याची आवश्यकता नाही असा टोला त्यांनी राज यांना लगावला.
तसेच ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे, बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात गुंडाचे राज्य सुरू आहे त्यावर राज ठाकरेंनी बोलायला हवं. राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जातेय. भाजपा आणि एकनाथ शिंदेंकडून मुंबईतल्या अनेक मतदारसंघात, ठाण्यात, पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार, ज्यांचे अंडरवर्ल्डशी आणि टोळ्यांशी संबंध आहेत. मी कायदा सुव्यवस्था खात्याचे पोलीस प्रमुख सत्यनारायण चौधरी यांना मी माहिती देईन. आम्ही पक्ष निरीक्षक नेमतो तसं गुंड टोळ्यांवर विधानसभेच्या म्होरक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. महाराष्ट्राचा विचका करून टाकला आहे, याचा बदला २० तारखेला घ्यायचा आहे अशी टीका राज ठाकरेंनी संजय राऊतांवर केली होती.