बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश

By दीपक भातुसे | Published: November 4, 2024 07:11 AM2024-11-04T07:11:31+5:302024-11-04T07:14:18+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज, सोमवार हा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मागील चार दिवस महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे प्रमुख बंड थंड करण्याच्या मोहिमेवर होते.

Maharashtra Assembly Election 2024: MVA Work for holding the rebels, 11 out of 15 rebels of Congress succeeded in holding the rally in Western Maharashtra | बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश

बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश

- दीपक भातुसे
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज, सोमवार हा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मागील चार दिवस महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे प्रमुख बंड थंड करण्याच्या मोहिमेवर होते. अनेक ठिकाणी बंडोबांना थंड करण्याचे नेत्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. तर काही बंडखोरांनी सोमवारी दुपारी तीनच्या आधी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेणार असल्याचे आश्वासन दिल्याचे मविआच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये १५ बंडखोर होते. चार दिवसात ११ बंडखोरांनी मनधरणी करण्यात यश आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. याशिवाय काँग्रेसमधील पुण्याच्या कमल व्यवहारे, नाशिकच्या हेमलता पाटील, मुंबईचे मोहसीन हैदर यांची मनधरणी करण्यातही पक्षाला यश आले आहे. 

रामटेकमध्ये राजेंद्र मुळक लढण्यावर ठाम
नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघ राजेंद्र मुळक यांच्यासाठी काँग्रेसला  हवा होता. मात्र मतदारसंघ उद्धवसेनेकडे गेला असून येथे विशाल बरवटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुळक यांनी अपक्ष अर्ज भरला असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर मुळक ठाम आहेत. तसेच हिंगोली मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर भाऊ पाटील कोरेगावकर हेदेखील  लढण्यावर ठाम आहेत.

परंडात काय स्थिती?
- शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवारांनी काही अपक्षांशी चर्चा केली, तर जयंत पाटील, सुप्रिया सुळेही चर्चा करत आहेत. आमच्या पक्षाचे ९० टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे शरद पवार गटाच्या एका नेत्याने सांगितले. 
- परंडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे हेच मविआचे अधिकृत उमेदवार असतील, तिथे उद्धवसेनेचे उमेदवार रणजित पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, असेही या नेत्याने सांगितले.

उद्धवसेनेत काय?
उद्धव सेनेकडून मुंबईतील बंडखोरांशी अनिल परब चर्चा करत होते. इथे वर्सोवा मतदारसंघात राजू पेडणेकर व दिंडोशी मतदारसंघात रुपेश कदम हे दोन बंडखोर असून त्यांच्याशी पक्षाने चर्चा केली आहे. तर खासदार संजय राऊत, अनिल देसाई व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी प्रयत्नशील होते.
शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी : काँग्रेसने बंडखोरांशी चर्चेची जबाबदारी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली होती. रमेश चेन्नीथला, अशोक गहलोत, भूपेष बघेल हे नेतेही चर्चा करत होते. चेन्नीथला तीन दिवस मुंबईत होते.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: MVA Work for holding the rebels, 11 out of 15 rebels of Congress succeeded in holding the rally in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.