नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 08:54 AM2024-11-08T08:54:19+5:302024-11-08T08:56:04+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाभरातून तब्बल एक लाख लोकांची सभेला उपस्थिती असेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला असून, उन्हाच्या झळांपासून रक्षण होण्यासाठी सभास्थळी तब्बल सहा भव्य डोमची उभारणी करण्यात येत आहे.प्रत्येक डोममध्ये सुमारे १५ हजार खुर्च्यांची व्यवस्था असणार आहे. सहाही डोममध्ये सुमारे एक लाख लोक बसतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये महायुतीने १४ उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात येत आहेत. धुळे येथील सभा सकाळच्या सत्रात आटोपल्यानंतर दुपारी नाशिकमधील पंचवटीतील तपोवनातील मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.धुळ्यातील सभा आटोपल्यानंतर मोदींचे हेलिकॉप्टर नाशिकला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बागेतील हेलिपॅड येथे उतरेल. तेथून मोटारीने ते तपोवनातील सभास्थळाकडे येतील.
या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, अमर साबळे, मंत्री गिरीश महाजन आदींसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व १४ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तब्बल एक लाखाहून अधिक लोक या सभेला उपस्थित राहतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.