“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:53 PM2024-10-20T12:53:17+5:302024-10-20T12:55:26+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे.

maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar group leader says opposition trying to deceive on ladki bahin yojana | “लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष जागावाटप अंतिम करून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यावर भर देत आहेत. यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याने ही योजना बंद होणार, अशीही चर्चा सुरू झाली आणि गोंधळ निर्माण झाला. अजित पवार गटातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन जनतेला केले आहे. 

निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याचे समजते आहे. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फसवायचे काम करतील. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरु झाली. योजनेचा आता चौथा महिना चालू आहे. चार महिन्याचे ६ हजार रुपये मिळायला हवे होते. पण आमच्या भगिनींना ७ हजार ५०० रुपये मिळाले. हे जास्तीचे १५०० रुपये तुम्हाला पुढच्या महिन्याचे दिलेले आहेत. सरकारला हे माहिती होते की, निवडणूक आयोग निवडणूक काळात आचारसंहितेच्या नावाखाली या योजनेला बंदी घालेल. त्यामुळे आम्ही आधीच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन एक महिन्याचे आगाऊ पैसे दिले. निवडणूक झाली की, पुन्हा ते पैसे तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करील, तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. 

याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे

ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असे फार थोडेसे लोक राहिले आहेत. सगळ्यांचे पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत. ९८ टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना मिळाले आहेत. ही आमची कायम स्वरूपी योजना आहे. निवडणुकीसाठी आणलेली ही योजना नाही. त्यामुळे याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती, असे आवाहन अदिती तटकरेंनी केले.
 

Web Title: maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar group leader says opposition trying to deceive on ladki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.