विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:30 PM2024-09-27T13:30:39+5:302024-09-27T13:38:08+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP AP) पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही दिवशी होण्याची शक्यता आहेत. त्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाकडून घेतला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीबाबत माहिती देताना अनिल पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाच्यावतीने शिवाजीरावा गर्जे आणि मी निवडणूक आयोगाकडे गेलो होते. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही तिथे केली. उमेदवारांसाठी असलेली निवडणूक खर्चाची मर्यादा वाढली पाहिजे. तसेच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करताना उमेदवाराला एकदा तरी विचारलं पाहिजे. महाराष्ट्रातील परिस्थिती आणि महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असल्याने इथे एका टप्प्यात निवडणूक घेतली तरी चालणार आहे, असे म्हणजे अनिल पाटील यांनी मांडले.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार की ही निवडणूक दोन ते तीन टप्प्यांपर्यंत लांबणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, २०१९ मध्येही महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही एकाच टप्प्यात झाली होती. त्यामुळे यावेळीही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात आटोपली जाईल, अशी शक्यता आहे.