नवमतदार फिरवू शकतात ५६ जागांवरील निकाल, गेल्या वेळच्या विजयाच्या मार्जिनपेक्षा यंदा नवमतदार जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:28 AM2024-11-04T11:28:25+5:302024-11-04T11:29:14+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार असून, एकूण मतदारांच्या २ टक्क्याहून अधिक संख्या ही १८-१९ वयाच्या नवमतदारांची आहे. अनेक ठिकाणी हे प्रमाण तर ३ टक्क्यांहून अधिक आहे.
- पवन देशपांडे
मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार असून, एकूण मतदारांच्या २ टक्क्याहून अधिक संख्या ही १८-१९ वयाच्या नवमतदारांची आहे. अनेक ठिकाणी हे प्रमाण तर ३ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मार्जिन आणि नवमतदारांच्या संख्येचे प्रमाण बघता ५६ मतदारसंघांमध्ये नवमतदारावर बरीच मदार असल्याचे चित्र आहे. ५६ ठिकाणी विजयाच्या मार्जिनपेक्षा नवमतदार अधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी भावी आमदार ठरवण्याची किल्ली या नवमतदारांकडे राहू शकते.
या जागीही चालू शकते युवकांची चलती
नागपूर दक्षिण, मुक्ताई नगर, कल्याण ग्रामीण, राजुरा, यवतमाळ, नागपूर मध्य, आर्णी, कळवण, श्रीगोंदा, चंदगड, नांदेड दक्षिण, उरण, चाळीसगाव, साकोली, गेवराई, करमाळा, नागपूर पश्चिम, कोरेगाव, शहादा, वसमत, डहाणू, सांगली, चिखली या मतदारसंघामध्ये २०१९ मधील विजयाच्या मार्जिनपेक्षा १ ते ५ हजार अधिक युवा मतदार आहेत.
कराड दक्षिण, कामठी, वर्धा, साक्री, पुणे कॅन्टोन्मेंट, हातकणंगले, वर्सोवा, नाशिक पश्चिम या मतदारसंघांमध्ये २०१९ मधील विजयाच्या मार्जिनपेक्षा युवा मतदारांची संख्या १ हजारपर्यंत अधिक आहे.