"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 03:43 PM2024-11-14T15:43:58+5:302024-11-14T15:44:59+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आलं आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली होती.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आलं आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली होती. तसेच मोदी आणि शाह यांचा पैसा गौतम अदानी सांभाळत आहेत, असा आरोप केला होता. त्याला आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब गौतम अदानी यांचं प्रायव्हेट विमान घेऊन सगळीकडे फिरतात. तेव्हा गौतम अदानी खटकत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
गौतम अदानींआडून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गटाकडून उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा विरोध असल्याचं दाखवलं जातंय. आम्ही गौतम अदानींच्या विरोधात आहोत. आम्हाला महाष्ट्रात गौतम अदानी नको, असं सांगितलं जातंय. आता गौतम अदानी हा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना एवढाच खटकत असेल, तर मग गौतम अदानी यांचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालतं? गेल्या दोन महिन्यांत गौतम अदानी यांना लपून छपून कोणकोण भेटलेलं आहे, याची माहिती आम्ही महाराष्ट्राला द्यायची का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
नितेश राणे म्हणाले की, अदानींचं विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीयं सगळीकडे फिरतात. या गोष्टी चालतात, तेव्हा गौतम अदानी खटकत नाही. तेव्हा गौतमभाई गौतम भाई म्हणत त्यांच्यासोबच ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी गौतम अदानींच्या नावाने खडी फोडायची, हा जो काही दुटप्पीपणा आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलेला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, गौतम अदानींचं देशाच्या विकासात योगदान आहे. आज देशत अदानींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्याच्यामधून रोजगार निर्माण होत आहे. म्हणून गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध. तुम्हाला जर तरुणांना रोजगार द्यायचा असेल, तर तुम्ही रोजगार देणाऱ्याच्या नावाने खडी कशी काय फोडू शकता, असा सवालही नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.