"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:03 PM2024-11-18T12:03:02+5:302024-11-18T12:04:48+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
भूम : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भूममध्ये सभा घेतली होती. यावेळी मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
भूम शहरामध्ये रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर यांनी सभा घेतली. या सभेत महादेव जानकर म्हणाले, "मी मुख्यमंत्री होणार नाही. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री मी कधीच होणार नाही. आईची शपथ घेऊन सांगतो. पण, पाच मिनिटं तरी पंतप्रधान झाल्यावर भूम-परंडातून हेलिकॉप्टर घेऊन फिरेन".
या सभेत महादेव जानकर यांनी भाजपवरही हल्लाबोल केला.भाजप चालू पार्टी आहे. माणसात माणूस आणि पक्षात पक्ष ठेवत नाही. शरद पवारांचे घर फोडलं तर बाळासाहेबांचे चिन्ह चोरलं, असा शब्दांत महादेव जानकर यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावतील. मात्र, त्यापूर्वी आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांचे नेते पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत.
परंड्यात ५२ टक्के गृहभेट मतदान
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार, ८५ वर्षे वयावरील मतदार व दिव्यांग मतदारांचे गृहभेट मतदान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी परंडा मतदारसंघात ही प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण नोंदणी केलेल्या मतदारांच्या तुलनेत ५२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.रविवारीही ही गृहभेट मतदानाची प्रकिया सुरु होती.