रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:17 PM2024-10-18T14:17:28+5:302024-10-18T14:19:22+5:30
Maharashtra Assembly Election 2024: एकामागून एक भाजपा नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच भाजपा नेत्यांच्या अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुकांची रांग लागली असून सरकारमधील मंत्री मध्यरात्री भेटी घेत असल्याने या भेटीमागील गूढ काय, याची उत्सुकता लागून आहे. लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत.
रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली होती. यानंतर आता आणखी एका नेत्याने अंतरावली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री १ वाजता ही भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजपा नेते आणि माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. परंतु, एकामागून एक भाजपा नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री येऊन अनेक राजकीय नेते मंडळींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे.