आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:06 AM2024-11-06T07:06:04+5:302024-11-06T07:06:31+5:30
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या काळात प्रत्येक सरकारी वाहनाची तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांसह अन्य सरकारी वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई - निवडणुकीच्या काळात प्रत्येक सरकारी वाहनाची तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांसह अन्य सरकारी वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत राज्यात पोलिसांच्या आणि सरकारी वाहनांमधून पैसे नेले जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या संदर्भात विचारले असता चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ' निवडणूक काळात सर्वच वाहने तपासण्याचे अधिकार तपासणी पथकांना असतात. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सूचना केली आहे. त्यानुसार सर्वांची वाहने तपासण्यात येतील. यात कुणी कुचराई केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.'
दादरमधील दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर जे नियमानुसार होते ते मंजूर केले आणि नियमबाह्य होते ते हटविण्यात आले. तेथे टांगलेले आकाश कंदील नियमबाह्य होते. ते हटविले आहेत, असे निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी म्हणाले.
विमानाने एबी फॉर्मचा खर्च लावणार
शिंदे सेनेच्या उमेदवाराचा एबी फॉर्म विमानाने पाठविण्यात आला होता. त्याचा खर्च पक्षाच्या निवडणूक खर्चात लावणार की संबंधित उमेदवाराच्या या प्रश्नात चोक्कलिंगम म्हणाले की, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. हा खर्च निश्चितपणे लावला जाईल, फक्त तो पक्षाच्या खात्यात लावायचा की उमेदवाराच्या हे नियम तपासून निर्णय करू.