"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 11:24 AM2024-11-17T11:24:15+5:302024-11-17T11:24:56+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी काल नाशिकमधील लासलगाव येथे केलेल्या एका विधानामुळे मराठा आंदोलक भावूक झाले आहेत. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, असं भावनिक विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं. 

Maharashtra Assembly Election 2024: "Now I am a guest for a few days", Manoj Jarange Patil emotional; An appeal to the supporters | "आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन

"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन

मागच्या दीड वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय ऐनवेळी जाहीर केला असला तरी त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थित मनोज जरांगे पाटील यांनी काल नाशिकमधील लासलगाव येथे केलेल्या एका विधानामुळे मराठा आंदोलक भावूक झाले आहेत. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, असं भावनिक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. 

नाशिकमधील लासलगाव येथे मराठा आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर आता मला साथ देत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये. मला आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी कायम सलाईन लावावं लागतंय. मी हे तुम्हाला सांगतोय कारण शेवटी हे शरीर कधी जाईल काही सांगता येत नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हेही सांगता येत नाहीये. शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. मी केलेल्या कठोर उपोषणांमुळे आता मला चालताना, चढता उतरतानाही चार चार पोरांना धरावं लागतंय, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे मराठा आंदोलकही स्तब्ध झाले.  

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील मतदानावेळीही जरांगे पाटील यांनी यावेळी महत्त्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले की, मी लोकसभेला सांगितलं होतं आणि आताही सांगतोय की, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा. मी तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे. मी जात कुणाच्याही दावणीला बांधलेली नाही. मालक तुम्हाला ठेवलंय. मतदान तुम्हाला करायचं आहे. मालकपण तुम्हीच आहात. मी तुमचा मालक नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "Now I am a guest for a few days", Manoj Jarange Patil emotional; An appeal to the supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.