दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:53 PM2024-10-31T13:53:07+5:302024-10-31T13:54:17+5:30
Maharashtra Assembly Election 2024:
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची लढत रंगणार आहे. येथे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार दीपक केसरकर हे रिंगणात आहेत. दरम्यान, आज सकाळी सावंतवाडीकरांना एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपक केसरकर आणि राजन तेली हे आज सावंतवाडीमधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात एकत्र आले. तसेच दोघांनीही एकत्रितपणे विठ्ठल-रखुमाईची आरती केली.
सावंतवाडीमध्ये महायुतीकडून दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्यानंतर राजन तेली यांनी भाजपाला रामराम ठोकत ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं होतं. तसेच त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीही जाहीर झाली होती. त्यातच मागच्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने बोचरी टीका केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपक केसरकर आणि राजन तेली हे दिवाळीनिमित्त आरतीसाठी विठ्ठल मंदिरात एकत्र आल्याने सावंवाडीकरही अवाक् झाले. आता विठुमाऊलीकडून मतांसाठीचा आशीर्वाद कुणाला मिळणार, याचीच चर्चा सुरू आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदासंघातून दीपक केसरकर यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तसेच आता ते येथून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, राजन तेली यांनी याआधी दोन वेळा सावंतवाडीमधून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांना दोन वेळा पराभवाचा धक्का बसला होता. दरम्यान, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्यासमोर भाजपाचे बंडखोर विशाल परब आणि शरद पवार गटाच्या बंडखोर अर्चना घारे परब यांचे आव्हान आहे.