"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:44 AM2024-11-19T10:44:14+5:302024-11-19T10:49:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदाराला धमकी आली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : "...otherwise it won't take long to become my Baba Siddique", death threat to Ramesh Kadam of Sharad Pawar group  | "...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 

"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 

Maharashtra Assembly Election 2024 :  सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार आणि नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदाराला धमकी देण्यात आली आहे. 

शरद पवार गटाचे मोहोळमधील माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. यासंदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे हत्या करण्याचा डाव असल्याचे यावेळी रमेश कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आहे. रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रिव्हॉल्वर, गाडी आणि पैसे दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या १५ दिवसांत रमेश कदम यांच्याबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला आहे.

या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर मुख्य आरोपी असलेल्या आबा काशीदचा शोध अद्याप सुरू आहे. आबा काशीदचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं मागावर आहेत. दरम्यान, या आरोपींवर रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे किंवा जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४०(२), १४०(३), ६२, ३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माझ्या जीवितास धोका असून मागील पंधरा दिवसात हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही’ अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : "...otherwise it won't take long to become my Baba Siddique", death threat to Ramesh Kadam of Sharad Pawar group 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.