एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:50 PM2024-10-20T16:50:01+5:302024-10-20T16:50:48+5:30
Maharashtra Assembly Election 2024: माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. परशुराम उपरकर यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ आणखी वाढणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समिकरणं झपाट्याने बदलत आहेत. काही दिवसांपूर्वी राजन तेली यांनी भाजपाला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता सिंधुदुर्गातील आणखी एका मोठ्या नेत्याने हाती मशाल घेतली आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. परशुराम उपरकर यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ आणखी वाढणार आहे.
शिवसेनेमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या परशुराम उपरकर यांनी नारायण राणेंनी बंड करून शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्गात पक्षाला नेतृत्व दिलं होतं. तसेच नारायण राणे यांच्याविरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत परशुराम उपकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण शिवसेनेनं उपरकर यांना विधान परिषदेवर घेत आमदारकी दिली होती.
पुढच्या काळात परशुराम उपरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता. तसेच मनसेचं जिल्हाध्यक्षपदही भूषवलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वा काही दिवस आधी परशुराम उपरकर यांनी मनसेलाही जय महराष्ट्र केला होता. त्यानंतर ते पुढे कुठल्या पक्षात जातील, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज त्यांनी शिवबंधन बांधून घेत हाती मशाल घेतली आहे. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला.