पवार कुटुंबीयांची एकत्र भाऊबीज झाली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:11 AM2024-11-04T11:11:37+5:302024-11-04T11:12:04+5:30
Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२३ मध्ये पवार कुटुंबाचे दिवाळी सेलिब्रेशन एकत्रित झाले होते. मात्र, यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पवार विरुद्ध पवार लढतीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांची राजकीय आणि काैटुंबिक गणिते बदलली आहेत.
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२३ मध्ये पवार कुटुंबाचे दिवाळी सेलिब्रेशन एकत्रित झाले होते. मात्र, यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पवार विरुद्ध पवार लढतीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांची राजकीय आणि काैटुंबिक गणिते बदलली आहेत. यंदा प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशिवाय पवार कुटुंबियांचा पाडवा आणि भाऊबीज साजरी झाल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला यंदा अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे शरद पवार आणि प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार व अन्य कुटुंबियांच्या उपस्थितीत दिवाळी सण साजरा झाला.
यंदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीजही साजरी झाली नाही. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भगिनींनी रविवारी बारामती येथील आपल्या निवासस्थानी बंधू राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, जयंत पवार व अभिजित पवार यांना औक्षण करत कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली. तसेच, बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचेही कुटुंबातील बहिणींनी औक्षण करीत भाऊबीज साजरी केली.