पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:11 PM2024-10-24T19:11:08+5:302024-10-24T19:12:11+5:30
पुण्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. त्यातील हडपसर जागेवरील उमेदवार आज घोषित करण्यात आला असून उर्वरित २ जागांवरील उमेदवार उद्या जाहीर होतील.
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ४५ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत पुण्यातील हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना तिकीट देण्यात आलं आहे. पुण्यातील या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला होता. मात्र मविआच्या चर्चेत ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे.
पुण्यातील हडपसर, पर्वती, खडकवासला हे मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आले आहे. हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे तर खडकवासला, पर्वती आणि पिंपरी चिंचवड याठिकाणी आम्ही उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर करू असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. हडपसर मतदारसंघ ठाकरे गटाला सुटेल, त्याठिकाणी माजी आमदार महादेव बाबर हे इच्छुक होते. त्यामुळे हडपसरवर दावा करण्यात येत होता. सुषमा अंधारे यांनीही काल हडपसर ठाकरे गटाला मिळेल असं विधान केले होते. परंतु राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत हडपसरचा समावेश असल्याने याठिकाणी ठाकरे गट काय भूमिका घेतो हे पाहणे गरजेचे आहे.
तर महाविकास आघाडीत बहुतेक जागांवर चर्चा झाली आहे. एकमताने जागा ठरवल्या आहेत. मुंबईतील अणुशक्तीनगर ही जागा राष्ट्रवादीला सुटलेली आहे. त्याठिकाणी उद्या उमेदवार ठरवू. आता निवडणुकीला फक्त २० दिवस शिल्लक आहेत. २७० जागांपर्यंत आमचा निर्णय झाला आहे. मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. काही जागांवर अदलाबदल होईल. लवकरच महाविकास आघाडीचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध केला जाईल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हडपसर मतदारसंघात काय स्थिती?
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये २००९ मध्ये हडपसर मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपाचे योगेश टिळेकर आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल झाल्याचे दिसते. याठिकाणी महायुतीने पुन्हा चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने या मतदारसंघात साईनाथ बाबर यांना तिकीट दिलंय. आता प्रशांत जगताप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.