अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 18:13 IST2024-11-10T18:10:36+5:302024-11-10T18:13:14+5:30
Vinod Tawde prediction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महायुतीतील घटक पक्ष किती जागा जिंकणार, याबद्दल विनोद तावडे यांनी एक अंदाज मांडला.

अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
Maharashtra Assembly Election prediction 2024: विधानसभा निवडणुकीत कोणाला बहुमत मिळेल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, याबद्दल अंदाज बांधण राजकीय अभ्यासकांनाही कठीण झाले आहे. हळूहळू प्रचाराचा पारा चढू लागला असून, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महायुती किती जागा जिंकणार, याचा आकडाच सांगितला.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले. निकाल कसा लागू शकतो, कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याबद्दलही अंदाज व्यक्त केला.
महायुती किती जागा जिंकेल? विनोद तावडे म्हणाले...
महायुती आणि महायुतीतील पक्षांना किती जागा मिळतील? असा प्रश्न विनोद तावडे यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, "अजून प्रचाराचे दिवस आहेत. कालच (८ नोव्हेंबर) मोदी, अमित भाईंचे प्रचार दौरे सुरू झालेत. आज (९ नोव्हेंबर) असं मानतो की, १५५ ते १६० जागांपर्यंत महायुती जाईल. आणि उरलेल्या जागांमध्ये महाविकास आघाडी असेल, अशी आजची स्थिती मी बघतोय."
भाजप १४८ पैकी किती जागा जिंकू शकतो?
याच प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे पुढे म्हणाले की, "भाजपला ९० ते १०० दरम्यान जागा असतील. चांगला स्ट्राईक रेट राखला जाईल. एकनाथ शिंदेंना ४० पर्यंत... ते अंदाज करत आहेत. आणि अजित पवारांना २० ते २५ जागा मिळतील. आज अजून प्रचारानंतर त्यांच्या जागा वाढू शकतात", असा अंदाज विनोद तावडे यांनी मांडला.
महाविकास आघाडीबद्दल अंदाज काय?
महाविकास आघाडीमध्ये कोणाचा स्ट्राईक रेट जास्त राहील असं वाटतं? तावडे म्हणाले, "काँग्रेसचा. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यानंतर उबाठा", असा अंदाज तावडे यांनी व्यक्त केला.