"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 09:00 AM2024-11-15T09:00:27+5:302024-11-15T09:01:45+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा केला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: "President's Rule came into effect in 2019 only because of Sharad Pawar's letter", Devendra Fadnavis' secret explosion | "शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली होती. ही मालिका अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळच्या घडामोडींबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या संदर्भातील अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं, परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.”

फडणवीस पुढे म्हणाले, “१० नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू. त्यादरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं.”

राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतचा किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले, “राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली.”

फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्याद्वारे २०१९ च्या राष्ट्रपती राजवटीसाठी शरद पवार यांनाच जबाबदार ठरवलं आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "President's Rule came into effect in 2019 only because of Sharad Pawar's letter", Devendra Fadnavis' secret explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.