ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:14 PM2024-10-26T16:14:27+5:302024-10-26T16:16:08+5:30

सध्या मी उभा राहणार नाही. माझी जबाबदारी वाढलेली आहे. प्रचारयंत्रणा राबवणे, गावोगावी जाणे प्रचार करणे हे काम आहे असं नामदेव जाधव यांनी सांगितले. 

Maharashtra Assembly Election 2024 - Professor Namdev Jadhav launched a party in the name of Chhatrapati Shashan, will contest 288 seats | ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?

ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?

पुणे - राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुती असो मविआ, मनसे असो किंवा वंचित, तिसरी आघाडी, चौथी आघाडी सगळीकडेच इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. अशावेळी राज्यात नवीन राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उतरवणार आहे. छत्रपती शासन असं या पक्षाचं नाव असून त्याचे प्रमुख प्राध्यापक नामदेवराव जाधव हे आहेत. 

प्रा. नामदेव जाधव यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात २ हजार १३६ मते मिळाली. ती दारू न पाजता, पैसे न देता आणि कुणाच्या पाया न पडता मिळवली असल्याचं ते सांगतात. या निवडणुकीत जाधव यांचे डिपॉझिट जप्त झाले, मात्र डिपॉझिटची चिंता कसली, सरकारकडे महसूल दिला. २५ हजार माझा कर भरला. विधानसभेला २८८ जागा लढवणार आहोत. प्रस्थापित पक्षाकडे उमेदवारीसाठी १०-१० कोटी मोजावे लागतात. ५० कोटी त्यांचे निवडणुकीचे बजेट आहे. आम्ही छोटं रोपटं लावतोय. त्याचे वटवृक्ष होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर छत्रपती शासन हा पक्ष नवीन उदयास आला आहे. तो २८८ उमेदवार उतरवणार आहे. जे कुठल्याही राजकीय घराण्यातून आले नाहीत, कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत. किमान पदवीधर असतील, ४० पेक्षा जास्त वय नसेल अशांना उमेदवारी देतोय. सध्या आम्ही ५ उमेदवार ठरवलेत. त्यात भोर विधानसभेतून माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे, कसबा मतदारसंघातून यूपीएससी तयारी करणारे अरविंद वेलकर, माढा मतदारसंघातून अभिमान लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे असं नामदेव जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान, सध्या मी उभा राहणार नाही. माझी जबाबदारी वाढलेली आहे. प्रचारयंत्रणा राबवणे, गावोगावी जाणे प्रचार करणे हे काम आहे. मी निवडणूक लढणे योग्य नाही. उमेदवार निवडीवर आमचा फोकस आहे. आमचे १५ उमेदवार निवडून आले तरी मी राज्यसभेवर जाणार आहे याची काळजी करू नका. बारामती विधानसभेत अजित पवार नावाचा तरूण उमेदवार देणार आहोत. अजित पवार नावाचा तरूण लढाऊ आहे. हा तरुण कोरेगावचा आहे. कोरेगावातून तो बारामती विधानसभेत लढवणार आहे असही नामदेव जाधव यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Professor Namdev Jadhav launched a party in the name of Chhatrapati Shashan, will contest 288 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.