विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 08:18 PM2024-10-30T20:18:10+5:302024-10-30T20:18:48+5:30

या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक आयोगाने सांगितले.

Maharashtra Assembly Election 2024 - Property worth 187 crores seized in the state in last 15 days, Election Commission action | विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

मुंबई - राज्यात सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे. यातच राज्यात निवडणुकीसाठी पैशांचा महापूर आल्याचं चित्र प्रशासकीय कारवाईतून दिसून येते. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचं बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करणे सुरू केले.

निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं. 

तसेच या कारवाईत प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार  करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक आयोगाने सांगितले.

पालघर, खेड शिवापूरमध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम

मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली. त्यावेळी या कारमधून पोलिसांनी जवळपास ५ कोटींची रक्कम जप्त केली होती. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Property worth 187 crores seized in the state in last 15 days, Election Commission action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.