...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:07 PM2024-11-15T13:07:16+5:302024-11-15T13:09:46+5:30
खडकवासला विधानसभेसाठी जे माझं व्हिजन आहे ते मोठे आहे. ते मांडायचे झाले तर रात्र जाईल. मी बोलून थकणार नाही, पुढच्या २५ वर्षाची तयारी आपण तयार करत चाललोय असं मयुरेश वांजळे यांनी सांगितले.
पुणे - माझ्या विठ्ठलाच्या नावाने हा जन लोट इथं जमला आहे त्यामुळे या उमेदवाराची ओळख करून द्यायची गरज नाही. डोळेबंद करून स्मरण करा, आपले सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांची जशी कार्यपद्धती होती तशाप्रकारे कार्य करणारा उमेदवार या खडकवासल्याने पाहिला असेल तर हा मयुरेश वांजळे विना दाढी मिशीचा संपूर्ण मतदारसंघात फिरेल असं विधान खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार मयुरेश वांजळे यांनी केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनेखडकवासला मतदारसंघात दिवंगत रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. २००९ साली याच मतदारसंघात रमेश वांजळे यांच्या रुपाने मनसेचा सोनेरी आमदार विजयी झाला होता. यावेळी मयुरेश वांजळे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात आले होते. प्रचारसभेत मयुरेश वांजळे वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं दिसून आले.
मयुरेश वांजळे म्हणाले की, मी आज सकाळी उठल्यापासून सातत्याने मला भाऊंची आठवण होते, मी जेव्हा या स्टेजवर चढून आलो हा जनसागर माझ्यासाठी जमलेला पाहिला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. माझ्या विठ्ठलाने किती पुण्य कमवून ठेवले आहे. लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात, संपत्ती सोडतात, पैसा सोडतात माझ्या विठ्ठल्याने ही सोन्यासारखी लंका जनमाणसांच्या रुपाने माझ्यासाठी सोडली आहे. माझे व्हिजन, ध्येय हे सातत्याने लोकांसमोर मांडत आलोय. तुम्ही युट्यूब, गुगलवर रिसर्च करा. तुमच्या सर्व उमेदवारांची कार्यपद्धती माहिती असायला हवी. त्यांनी इतिहासात काय केले, काय काम केले हे बघायला हवं. जे स्वप्न आपल्या रमेशभाऊ वांजळे यांच्या जाण्याने अपूर्ण राहिले आहे. ते स्वप्न पूर्ण करणारा हा एकच छावा आहे. तो छावा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या २३ तारखेला शंखनाद करत हा तुमचा छावा तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तत्पर आहे. खडकवासला विधानसभेसाठी जे माझं व्हिजन आहे ते मोठे आहे. ते मांडायचे झाले तर रात्र जाईल. मी बोलून थकणार नाही, पुढच्या २५ वर्षाची तयारी आपण तयार करत चाललोय असं त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंनीही दिला रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा
खडकवासला मतदारसंघात राज ठाकरे यांनी सभेत रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे म्हणाले की, आज माझे मित्र, सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलाच्या प्रचारासाठी मी इथं आलोय, मयुरेशला मी पहिल्यांदा बघितला. माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे आल्यासारखा वाटला. हा तसाच दिसतो. तो राहुल माझा पुतण्या, नंतर कळालं की आमच्या रमेश वांजळेंचा मुलगा आला आहे. मग पुन्हा एक लक्षात आले, शेवटी पुतण्याच आला आहे. मला तो दिवस आजही आठवतो, आमचा रमेश शेवटचा कुणाशी बोलला असेल तर तो माझ्याशी बोलला. मी त्याला फोन लावला, तो म्हणाला, साहेब मी हॉस्पिटलला आलोय, एमआरआय काढायला, १० मिनिटांत एमआरआय काढल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं, झाल्यावर फोन कर, मला बोलायचंय, महत्त्वाचं आहे. १५ मिनिटांनी मला फोन आला आमचा रमेश गेला. आतातर माझ्याशी बोलला, एमआरआय काढताना गेला. मला पुढे काय बोलायचं हे समजेना. बाकीचे अनेक जण मला सोडून गेले मात्र आज रमेश असता तर तो माझ्याबरोबर असता असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अनेकदा मी त्याला सांगायचो, गळ्यातील वजने काढ, तो माझ्यासमोर घालायचा नाही, बाहेर गेल्यावर घालायचा. आज मयुरेश मला पुन्हा रमेशची आठवण करून देतो. मयुरेशचा आकारही तसाच आहे आणि सोन्याने मढलेलाही तसाच आहे. गोड पोरगा आहे. प्रामाणिक मुलगा आहे. आज जे तुम्ही परत मतदान कराल, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करालच कराल पण मतदान करताना तुम्हाला वाटेल आपण परत रमेश वांजळेंसाठी मतदान करतोय असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.