कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:49 PM2024-10-25T15:49:35+5:302024-10-25T15:50:38+5:30
Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली असून, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोकणामध्ये वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या जागावाटपात झुकतं माप देऊन अधिकच्या जागा सोडण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असून, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली असून, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत. तसेच त्यांना शिंदे गटाने येथून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने भाजपामधून आलेल्या राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक असलेल्या अर्चना घारे परब यांनी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांना यश न आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज त्यांना आपला अपक्ष उमेदवारी अर्द दाखल केला आहे.
आता अर्चना घारे परब यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्यास येथील लढत ही तिरंगी होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपामधून इच्छूक असलेल्या विशाल परब यांनीही बंडखोरीचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे विशाल परब हेही रिंगणात उतरले. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक केसरकर, ठाकरे गटाचे राजन तेली आणि अपक्ष बंडखोर अर्चना घारे-परब आणि विशाल परब या चार उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.