भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:19 PM2024-12-02T15:19:59+5:302024-12-02T15:28:55+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षक म्हणून भाजपाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची नियुक्ती केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Result: BJP appointed Nirmala Sitharaman and Vijay Rupani as observers for the selection of legislative group leaders | भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय

भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षक म्हणून भाजपाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची नियुक्ती केली आहे.

एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या आणि नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत आढेवेढे घेत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच भाजपाने मात्र नव्या सरकारच्या स्थापनेबाबत एक पाऊल पुढे टाकलं आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्ष गटनेत्याच्या निवडीसाठी ४ डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तसेच या बैठकीचं निमंत्रण हे भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांना पाठवण्यात आलं आहे. तसचे या बैठकीचे निरीक्षक म्हणून निर्मला सीतारमन  आणि विजय रुपानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन आणि विजय रूपानी हे मंगळवारी रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना १३२ जागांवर विजय मिळवला होता. तसेच विजयानंतर भाजपाने महायुतीमधून सर्वात मोठा पक्ष ठरत मुख्यमंत्रिपदावर दावाही ठोकला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचंही समोर येत आहे, अशा परिस्थितीत आता ४ तारखेला भाजपाच्या केंद्रीय पक्ष निरीक्षणांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, याबाबत उत्सुकता निर्माण झालीआहे.
  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Result: BJP appointed Nirmala Sitharaman and Vijay Rupani as observers for the selection of legislative group leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.