Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:23 PM2024-11-23T12:23:45+5:302024-11-23T12:57:34+5:30
Pravin Darekar : जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. निवडणुकीची आज सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू आहे. पहिल्या कलानुसार महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रात महायुती २०० पार जाईल असे चित्र दिसून येत आहे. माझ्या मताने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, बाजूने उभा आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठे यश मिळत आहे. आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. आता संजय राऊत यांनी विमान खाली उतरावे. त्यांना आता वेड्याच्या रूग्णालयात दाखल करावे लागेल, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
(Maharashtra Election Results 2024)
आता मुख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार आहे. जो पक्ष मोठा आहे, त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात येते. भारतीय जनता पक्ष सवाशेच्या आसपास पोहोचणार असून भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा बनणार आहे. यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारले होते, त्यासाठी हम सब एक है चा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचे सरकार, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळे अधिक मतदान झाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असे वाटले नव्हते. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, असे प्रवीण दरेकर म्हणाले.