"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:53 PM2024-12-02T17:53:33+5:302024-12-02T17:54:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरीही महायुतीला नव्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांची निवड करून सरकार स्थापन करता आलेलं नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे. पुढे तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं मी एकनाथ शिंदे यांना आधीच सांगितलं होतं, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांना भाजपाने पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यास दिलेला नकार आणि सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक वाटा मिळण्याची कमी झालेली शक्यता, याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना बऱ्याचदा सांगत होतो की, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. रात्री दोन वाजताही सर्वसामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री मी एकनाथ शिंदे यांच्या रूपात पाहत होतो. त्यामुळे शिंदे यांना आपण दाबून ठेवलं पाहिजे असं भाजपाला वाटत होतं. एकनाथ शिंदे यांचं काम बोलत होतं, त्यामुळे सत्तेत असताना ते त्यांना दाबू शकले नाहीत. भाजपाला एकहाती सत्ता घ्यायचीच आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान, महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच वेगवेगळे फॉर्म्युलेही समोर येत आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी गृहमंत्रिपदासाठी शिंदे गट हा आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारता सरकारबाहेर राहतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.