"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 07:08 PM2024-11-22T19:08:02+5:302024-11-22T19:08:38+5:30
Eknath Shinde: जून २०२२ एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे ५० आमदार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार शिंदेंनी भाजपच्या साथीने उलथविले होते.
महाराष्ट्रात उद्या मतमोजणी होणार आहे. कोणाचे सरकार येईल, मुख्यमंत्री कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडानंतर त्यांनीच दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही असे म्हणत अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना राजकारण सोडेन या शब्दाची आठवण करून दिली आहे.
जून २०२२ एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे ५० आमदार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार शिंदेंनी भाजपच्या साथीने उलथविले होते. शपथविधी झाल्यानंतर मुंबईतील शक्तीप्रदर्शन सभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असे भर सभेत वक्तव्य केले होते. याची आठवण ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आज केली आहे.
शिंदे काय म्हणालेले...
माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांचे टेन्शन होते. त्यांचे वाईट होऊ नये. यांच्यापैकी एकही पडणार नाही. एक माणूस जरी पडला तरी मी राजकारण सोडून निघून जाईन, सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच, असे शिंदे म्हणाले होते. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असे नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितले असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडेही बोट दाखविले.