बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आमची राजीनाम्याची तयारी, नाना पटोले यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:56 IST2024-12-10T15:55:22+5:302024-12-10T15:56:33+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मरकडवाडीला भेट दिली.

बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आमची राजीनाम्याची तयारी, नाना पटोले यांचं मोठं विधान
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच इव्हीएमवर शंका घेतली जात आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मरकडवाडीला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेत असल्याचा आमचीही राजीनाम्याची तयारी आहे, असं मोठं विधान केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, भाजपावाले राजीनामे द्यायचं आव्हान देत आहेत. उत्तमराव जानकर यांनी सांगितलंय आणि मीसुद्धा सांगतो की, जर निवडणूक आयोगाने इव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेऊ असं जाहीर केलं तर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. मात्र निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार असल्याचं त्यांनी लिहून आणावं, असं प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिलं.
ते पुढे म्हणाले की, बाकी निवडणूक आयोग कुणाची कठपुतळी झाला आहे हे सर्वांना माहिती आहे. एका रात्रीत ७६ लाख मतं कशी वाढली, याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही. सत्ता येईल आणि जाईल, पण लोकशाही टिकली तर सर्व काही राहील, हे लक्षात ठेवलं पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.