सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:35 AM2024-11-01T09:35:10+5:302024-11-01T09:36:28+5:30

Maharashtra Assembly Election 2024: सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या निवडणुकीतून माघार घेतल्यास विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Sada Saravankar met Chief Minister Eknath Shinde, discussed Mahim Assembly's seat, will there be a big decision? | सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?

सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?

या विधानसभा निवडणुकीत  मुंबईमधील माहिम विधानसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांना या जागेवर पाठिंबा द्यावा, अशी भूमिका महायुतीमधील भाजपाने घेतली आहे, तसेच शिंदे गटातील काही नेतेही तसं मत मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथून निवडणूक लढवत असलेले शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये माहीम विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आणि पुढील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. 

दरम्यान, सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या निवडणुकीतून माघार घेतल्यास विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे. मात्र सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून, माझ्या मतदारांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे, असं सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

सदा सरवणकर हे माहिम विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये सरवणकर यांनी मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये त्यांनी मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते. या भागात सदा सरवणकर यांचा चांगला जनसंपर्कही आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Sada Saravankar met Chief Minister Eknath Shinde, discussed Mahim Assembly's seat, will there be a big decision?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.