सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:28 IST2024-11-07T14:20:17+5:302024-11-07T14:28:30+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.

सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. दरम्यान, महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.
शरद पवारांवरील टीकेवरून सुरू झालेला वाद थांबला नसतानाच सदाभाऊ खोत यांनी पुन्हा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दात टीका केली आहे. २४ तासात दोन वादग्रस्त विधानं केल्यामुळे सदाभाऊ खोत आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना ‘देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा’ असा उल्लेख केला. त्यालाही उत्तर देताना सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, संजय राऊत यांना गावगाडा माहिती नाही. शेतकऱ्याचा राखणदार कुत्रा याचा मागमूस असायचा पताच नाही. त्यांना इतकंच सांगेन की कुत्रा हा इमाने इतबारे त्याच्या धन्याची राखण करत असतं. ते खाल्लेल्या अन्नाला जागत असतं. तसंच, आम्ही आमच्या धन्याची इमाने इतबारे आमच्या धन्याची राखण करत आहोत, याचा सार्थ अभिमान आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, २०१४ मध्ये मोदींचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी हिंडत होता. २०१९ मध्येही तुम्ही भाषणं करत होता. सत्तेत येताच पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा, कुत्र्याएवढा जरी तुमच्यात इमानदारपणा असता तरीसुद्धा महाराष्ट्रानं कौतुक केलं असतं. परंतु मला त्यांच्यावर जास्त बोलावं असं वाटत नाही. कारण, डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जात असतं, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आता या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.