हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:32 PM2024-11-09T14:32:41+5:302024-11-09T14:38:23+5:30
मशिदीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे.
मुंबई - आयुष्यात राज ठाकरेंचं सरकार येणार नाही. अशी विधाने करणार्यांचे सरकार कधीही येऊ शकत नाही. हा देश पुरोगामी आहे. कोणी 'माई का लाल' अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन करून मशिदीतील भोंगे काढू शकत नाही. पोलिसांना बाजूला हटवा, कुठल्याही मशिदीत येण्याची हिंमत करून दाखवा असं खुलं चॅलेंज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिले आहे.
सत्ता आली तर ४८ तासांत मशिदीवरील भोंगे हटवू असं विधान राज ठाकरे यांनी केले होते, त्यावरून अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरेंनी पोलीस बाजूला हटवून मुंबईतल्या कुठल्याही मशिदीत येऊन दाखवावं. मानखुर्द शिवाजीनगरच्या मशिदीत या भोंगे हटवून दाखवा, तुम्ही स्वत:ला काय समजता, मुस्लीम सक्षम नाहीत? तुम्ही आम्हाला चॅलेंज करू नका. आम्ही कधी मंदिरात घुसून लाऊडस्पीकर उतरवू हे बोललो नाही. मंदिरावाल्यांना मारणार नाही बोललो. फालतू गोष्टी करू नका असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तर महाविकास आघाडी ही मुस्लीम लीग नाही. मुस्लिमांची वेगळी पार्टी नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे आहेत. जे या देशातील आहेत, त्यांना पाठिंबा दिला जात आहे. आम्ही मुस्लिमांचा पक्ष बनवत नाही. ज्या लोकांनी अत्याचार केले ते आमच्याकडून मतांची अपेक्षा कशी करता, यांना दु:ख का होतंय. व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारख्या गोष्टी बोलल्या जातात. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशाप्रकारे भाषा वापरणे हे योग्य नाही. मी परळ लालबागला उभा राहिलो तर मला मते मिळतील का, प्रत्येकाची आपापली व्होटबँक असते. त्यांच्याकडे मते मागितली जातात. याचा त्रास इतरांना व्हायला नको असंही अबू आझमी यांनी म्हटलं.
दरम्यान, महायुती आणि राज ठाकरेंकडे काही मुद्दे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार महाविकास आघाडी आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही महायुतीने भ्रष्टाचार केला. अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे. जनतेला मूर्ख बनवण्याचं काम भाजपा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रिपदी असलेला व्यक्ती लोकांची दिशाभूल करणारी विधाने करतो. वक्फ बोर्डाची जमीन ही आमच्या पूर्वजांनी मशीद, मदरसा, दर्गा, हॉस्पिटल यांना दिलेल्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर सरकारने कब्जा केला आहे. त्यावर सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालये उभारली. ही आमची जमीन आहे त्या हडपल्या आहेत. जनतेची दिशाभूल करणारे विधाने भाजपाकडून केली जात आहेत असा आरोप अबू आझमींनी केला.
...तर सरकार ताडकन् कोसळेल
अबकी बार ४०० पार बोलणारे २३० वर आले, २ कुबड्या घेऊन सरकार चालतंय. जर या कुबड्या काढल्या तर सरकार ताडकन् कोसळेल. राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल त्यानंतर यांचा पत्ता साफ होईल. २०१४ च्या आधी देशात बुरखा बंदीची भाषा झाली होती का? गाय-बैलाच्या नावाने मुस्लिमांना मारहाण व्हायची का, मॉब लिचिंगचे प्रकार याआधी व्हायचे का, गरीब मुस्लिमांना एकटं पकडून त्यांना दाढीवरून अल्लाहला शिवी द्या, जय श्री राम बोला असं जबरदस्तीने बोलायला लावायचे का या सर्व गोष्टी देशात घडतायेत. त्यामुळे केवळ उलेमा नाही तर देशातील सर्व लोक जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी यांच्याविरोधात एकत्र यायला हवं. भाजपा कोणाला वेड्यात काढू शकत नाही असं अबू आझमींनी सांगितले आहे.