राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:10 PM2024-11-17T15:10:04+5:302024-11-17T15:13:00+5:30
तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं संजय राऊत यांनी म्हटलं.
मुंबई - एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मला कारणच कळले नाही. मी म्हटलं, आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. २३ तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी, खटाखट..अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत सैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. आम्ही ईमान विकलं नाही. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही XX सारखे वागलो नाही, तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी विक्रोळीच्या सभेत राज यांच्यावर जोरदार प्रहार केला. राऊत म्हणाले की, राज ठाकरे असं म्हणाले, इथं भिकारडा संपादक राहतो. बरोबर आहे, नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र इतका भिकारी केला आहे. त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता हे तुमचे बाळासाहेबांवरील प्रेम आहे. ज्या 'सामना'ने या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अस्मितेशी लढाई ३५-४० वर्ष मी लढत राहिलो. तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ तुम्ही इथे बाहेर काढली. ते ठाकरे आहेत तर आम्ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले आहोत. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका, महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका. आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही ईडीत जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात बाहेर आलो. भगवा फडकवत आलो. तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं त्यांनी म्हटलं.
तसेच विक्रोळीत मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेत आणि पोपट आला होता. सुपारीबाज राज ठाकरे इथं दोनदा येऊन गेले. कशासाठी आले, फडणवीसांच्या आदेशाने ते आले. येऊ द्या. लोकशाही आहे. लोकशाही निवडणूक होत असते, एकमेकांविरोधात उमेदवार उभे करतो. मात्र इथे आले महाराष्ट्रात अनेक विषय असताना बोलले कुणावर तर माझ्यावर, मी त्यांना स्वप्नात दिसतो. नरेंद्र मोदी, अमित शाह, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. आपण ठाकरे आहात ना, ज्याने बाळासाहेबांची शिवसेना फोडली, त्याचे फार कौतुक आहेत, अशा फडणवीसांची तुम्ही लाचारी पत्करताय हे ठाकरेंचे काम नाही. त्यापेक्षा आम्ही राऊत बरे, लढेंगे, जितेंगे आणि संघर्ष करू. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची, कायद्याची पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत. राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मी आमंत्रण देतो अधून मधून तुम्ही इथे येत राहा, इथे तुमच्या खाटा टाकायचे काम आमचे शिवसैनिक करतील आणि आमचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील. एकदिवस तुमची त्या खाटेवरून राजकीय अंत्ययात्रा काढू. तुम्हाला महाराष्ट्रातून संपवून टाकू. या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असा घणाघात संजय राऊतांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला. ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नरेंद्र मोदी-अमित शाह या २ व्यापाऱ्यांनी तोडली, फोडली, विकली त्यांच्याविषयी राज ठाकरेंना ममत्व असेल, प्रेम असेल तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांची दलाली करताय. जो महाराष्ट्र विकायला काढला आहे गौतम अदानींना त्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला देशोघडीला लावण्याच्या सुपाऱ्या घेतल्यात त्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला तरुणाला बेरोजगार केले जातेय, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जातायेत त्यावर बोलत नाही. पण देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं बोलतायेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते असंही संजय राऊतांनी सभेत सांगितले.
एकनाथ शिंदेंवरही बरसले
सुनील राऊतांचा विजय १०० टक्के आहे त्याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यांना किती मताधिक्य मिळेल हे तुमच्या हातात आहे पण तरीही काही लोकांची खुमखुमी जात नाही. त्यांच्याविरोधात एकही उमेदवार मिळत नव्हता. बकरा मिळाला नाही म्हणून बकरी केली. बकरी आली म्हणून निवडणूक आयोगाने खटला भरला. बकरी हा असंसदीय शब्द आहे का? आपण म्हणतो, बळीचा बकरा केला, आता बाई आली म्हणून बकरी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिथे ४० गद्दार आहेत तिथे बकरे कापले जाणार आहेत. हरण्याची खुमखुमी काही जात नाही. मला त्रास देण्यासाठी इथे कोण कोण आले, काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला, हा नाच्या आमचा पराभव करणार? असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.