राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:06 PM2024-11-12T12:06:20+5:302024-11-12T12:14:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत.
मुंबई - राज ठाकरे काय म्हणतात, त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेंना गुजरात आणि महाराष्ट्राचं एकाचवेळी नेतृत्व करण्याची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार काही स्थान नाही अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेच आहेत. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाबद्दल राज ठाकरेंच्या मनात काय आहे याबाबत आमच्या मनात शंका कायम राहील. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रचार करतायेत. उद्धव ठाकरे यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. शरद पवारांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते ज्या संघर्षाने महाराष्ट्रात उतरले आहेत. तो स्वत:च्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्यापद्धतीने गुजरातच्या २ व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची जी लूट चालवली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे २ पक्ष फोडले आणि हे महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. हे दुर्दैव आहे. ते खूप महान नेते आहेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडे भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच पण महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या २ व्यापाऱ्यांविरोधात त्यांची लढाई सुरू आहे अशा भाषेत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.
कोण होते मोरारजी देसाई?
काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान करणारे मोरारजी देसाई यांची भूमिका महाराष्ट्राच्या निर्मितीत आडमुठीपणाची राहिली. १९७७ साली देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा ते पंतप्रधान बनले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. काँग्रेस पक्ष आणि त्यावेळचे नेते यांच्याविरोधामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. या लढ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा देत व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका सुरू ठेवली होती. त्यावेळी काँग्रेस सरकारने बाळासाहेब ठाकरेंच्या नावे अटक वॉरंट जारी केले होते.