"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 08:15 AM2024-11-10T08:15:48+5:302024-11-10T08:21:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : स्वत: चुकीचं वक्तव्य करायचं आणि काँग्रेसनं आणि देशातील लोकांनी चूक दाखवली की, म्हणायचं ही चूक नाही. हे मोठं धाडस म्हणावं लागेल. म्हणजे केलेली चूक सुद्धा मान्य करायची नाही. महाराष्ट्रातील महिला भगिनी ही गोष्ट विसरणार नाहीत, असे सतेज पाटील म्हणाले.
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे.याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेवरून राजकारण पेटले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी निशाणा साधला आहे. सरकारने एक जाहिरात देऊन योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना अर्ज करायला सांगितले पाहिजे होते. पण खोटं बोल रेटून बोल ही महाडिकांचा स्टाईल आहे. त्यांना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप नाही, ते उलट आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यांच्या व्यवस्था करतो, या शब्दाचा अर्थ काय? असा सवाल सतेज पाटील यांनी केला आहे.
शनिवारी सतेज पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात, तसला हा प्रकार आहे. स्वत: चुकीचं वक्तव्य करायचं आणि काँग्रेसनं आणि देशातील लोकांनी चूक दाखवली की, म्हणायचं ही चूक नाही. हे मोठं धाडस म्हणावं लागेल. म्हणजे केलेली चूक सुद्धा मान्य करायची नाही. महाराष्ट्रातील महिला भगिनी ही गोष्ट विसरणार नाहीत. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारायचे की, भाजपच्या खासदारांनी केलेलं हे वक्तव्य तुम्हाला मान्य आहे का? तसंच, परवा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. भाजपचे नेते बेताल वक्तव्यं करुन महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत चालले आहेत. धनंजय महाडिक आपल्या भाषणात बहिणींना धमकी देतात, तुमची व्यवस्था करतो बोलतात. व्यवस्था करतो, म्हणजे याचा अर्थ काय? हा राज्यातील आणि कोल्हापूरमधील महिलांना धमकी देण्याचा प्रयत्न आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान, वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना योजनेत सामावून घेण्याच्यादृष्टीने आपण हे वक्तव्य केले होते, त्याचा काँग्रेसने विपर्यास केला, असा दावा धनंजय महाडिक यांनी केला. याबाबत सतेज पाटील म्हणाले की, वंचित महिलांना लाडक्या बहीण योजनेत सामावून घ्यायचे होते तर त्यांचा नाव आणि फोटो घ्या, असे बोलायची काय गरज होती. सरकारने एक जाहिरात देऊन योजनेपासून वंचित असलेल्या महिलांना अर्ज करायला सांगितले पाहिजे होते. पण खोटं बोल रेटून बोल ही महाडिकांचा स्टाईल आहे. त्यांना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप नाही, ते उलट आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यांच्या व्यवस्था करतो, या शब्दाचा अर्थ काय? धनंजय महाडिकांचं शिक्षण झालं नाही की, त्यांना मराठी भाषा कळत नाही. भाजपने सांगितलंय की त्यांनी स्वार्थासाठी हे नाटकं केलं आहे, निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. राज्यातील महिला महाविकास आघाडीला मतदान करुन याचं उत्तर देतील, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले धनंजय महाडिक?
लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले आहे. ते म्हणाले, "जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. आपल्या शासनाचे घ्यायचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. अनेक भगिनी महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा आणि लगेच म्हणायचे पैसे बंद करतो. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्य भर सभेमध्ये धनंजय महाडिक यांनी शनिवारी केले.