जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:38 AM2024-10-23T11:38:11+5:302024-10-23T11:45:54+5:30

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे.  

Maharashtra Assembly Election 2024: Seats have been allocated, but who will lead Mavia? Sanjay Raut said, "... will announce the name on this day".  | जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला १०५, ठाकरे गटाला ९५ आणि शरद पवार गटाला ८५ जागा सुटल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार, सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण बनणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत सूचक विधान केलं आहे.  महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचं नाव मी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जाहीर करेन, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा, यावरून मविआमधील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद दिसत आहेत. एकीकडे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचं नाव समोर केलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील, तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव पुढे केलं जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार आल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार, याबाबत  सूचक विधान करताना संजय राऊत म्हणाले की, आज संध्याकाळी उमेदवारी याद्या जाहीर होऊद्यात. त्यानंतर निवडणुका होतील. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागतील. २३ तारखेला निकाल लागायला सुरुवात होईल, तेव्हा बरोब्बर साडे दहा वाजता मी तुम्हाला महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे मी तुम्हाला सांगेन.

यावेळी महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या चर्चेची झालेली प्रगती आणि त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागा याबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला जागावाटपावर शेवटचा हात फिरवण्यासाठी आता बैठकीची गरज आहे, असं मला वाटत नाही. शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल. तसेच शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी, असं लोकांना वाटतं. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. त्यामुळे शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी ११ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असेही संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Seats have been allocated, but who will lead Mavia? Sanjay Raut said, "... will announce the name on this day". 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.