मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:41 PM2024-11-09T18:41:37+5:302024-11-09T18:49:18+5:30

अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र खोटे असल्याची शरद पवार गटाची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar group information that the letter of acceptance of 17 demands of All India Ulema Board is fake | मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी १७ कलमी अट ठेवल्या आहेत. या अटींमध्ये वक्फ विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के मुस्लिम आरक्षण, इमाम आणि मौलाना यांना १५,००० रुपये मासिक भत्ता यांचा समावेश आहे. यामध्ये आरएसएसवर बंदी घालण्याचीही अट आहे. यासंदर्भात अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राचे अध्यक्ष नायब अन्सारी यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना पत्र लिहीले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी सर्व अटी मान्य केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर आता शरद पवार गटाने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, आरएसएसवर बंदी यांसारख्या १७ अटी घातल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले होते. पत्रात उलेमा बोर्डाने जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर त्यांनी वक्फ विधेयकाला विरोध करावा आणि मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितीश राणेंसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मंडळाने केली.

मात्र आता या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीसाठी काम करावे असं म्हटलं आहे. मात्र आता हे पत्र खोटं असल्याची माहिती शरद पवार गटाने दिलं आहे. "भय पायउतार होण्याचे त्यासाठीच कारनामे लबाड लांडग्याचे. कटूनितीचा गुणधर्म विरोधकांनी कोळून प्यायलेला दिसतोय. समाजमाध्यमांवर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे प्रसिद्ध होणारे पत्रक याचे द्योतक आहे. ओढूनताणून एखाद्या प्रकरणाचा चिखलफेक करत समोरच्यावर बेछूट बिनबुडाचे आरोप करण्याचा हा प्रयत्न वेळीच ठेचून काढलाय. अशा खोट्या बातम्यांवर, फेक नरेटीव्हवर विश्वास ठेवून आपला अमूल्य वेळ दवडण्याची गरज नाही," असं म्हणत शरद पवार गटाने  हे पत्र खोटं असल्याचे म्हटलं आहे.


काय म्हटलंय पत्रात?

"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ऑल इंडिया उलमा बोर्ड आम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याबाबतचे व आपल्या १७ मागण्यांबाबतचे निवेदन प्राप्त झाले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण व्यक्त केलेल्या १७ मागण्यांसंदर्भात आपणास सांगू इच्छितो की, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितपणे पाऊले उचलू, महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत," असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच या पत्रावर जयंत पाटील यांनी खोटी स्वाक्षरीदेखील आहे.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar group information that the letter of acceptance of 17 demands of All India Ulema Board is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.