शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस

By यदू जोशी | Published: October 31, 2024 07:15 AM2024-10-31T07:15:31+5:302024-10-31T07:26:33+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

Maharashtra Assembly Election 2024 : Sharad Pawar is the father of house breaking: Devendra Fadnavis | शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राजकारणातील घरे, कुटुंब फोडण्याचे महाराष्ट्रातील जनक शरद पवार हेच आहेत, आजही ते हेच करत आहेत तरी त्यांची ही कृती म्हणजे चाणक्यनीती आणि मी तसे थोडेसेही केले तर ते डावपेच? हा कुठला न्याय? लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. यदु जोशी यांनी फडणवीस यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : तुम्ही डावपेच खेळता असे आरोप करून खलनायक म्हणून तुमची प्रतिमा तयार केली जाते. मी दोन पक्ष फोडून परत आलो हे तुमचेच वाक्य होते.... त्या बद्दल काय म्हणाल? 
उत्तर : मी तसे गमतीने बोललो होतो एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात. मी पक्ष फोडला हा दावा मी कधीही केलेला नाही. पण गमतीही सार्वजिनक मंचावर करू नयेत, हे आता लक्षात ठेवले पाहिजे. महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकांनी दिवसरात्र माझ्यावर, कुटुंबावर हल्ले केले. देवेंद्र फडणवीसला व्हिलन ठरवा हे त्यांचे एकमेव ध्येय होते. ते यशस्वी होऊ शकले नाहीत. फडणवीसांचा संबंध नाही त्याच्याशी जोडून त्यांची बदनामी केली जाते, हे लोकांना कळू लागले आहे, विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे. मी कसा आहे, जातीपातींपलिकडे जाऊन काम करतो हे लोकांना कळते. 

प्रश्न : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील फक्त आपल्यालाच लक्ष्य करतात, असे का होते? 
उत्तर : मी राज्याचा प्रमुख नाही, तरी सर्व निर्णयांची जबाबदारी ते माझ्यावर टाकतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे जनता फार विश्वास ठेवून माझ्याविषयी मत वाईट करेल असे मला वाटत नाही. माझी आजही जरांगे पाटील यांना एकच विनंती केली की तुम्हाला जे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले लायक वाटतात त्यांच्याकडून लेखी घ्या की, त्यांचे सरकार आले तर ते ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देतील. यांच्यापैकी एकानेही लेखी तर सोडाच तसे विधानही केलेले नाही. मी मराठा आरक्षण सर्वांत आधी दिले. ते हायकोर्टात टिकवले, एक लाख मराठा उद्योजक घडवले, ‘सारथी’ची स्थापना करून नोकऱ्यांसाठी तरुणांना प्रशिक्षण दिले, फेलोशिप दिली, तरी मलाच दोषी ठरवायचे, आणि ३०-३५ वर्षे सत्तेत होते त्यांना जाबच विचारायचा नाही. याच्या पाठीमागची भूमिका मराठा समाजाला बरोबर समजते. 

प्रश्न : प्रस्थापित आमदारांना पुन्हा संधी दिली. नवीन चेहऱ्यांना संधी का दिली नाही? भाजपची अशी काय मजबुरी होती? 
उत्तर : आम्ही काही निकष ठरविले होते आणि त्यात जे ५० टक्क्यांवर जातील त्यांना अँटिइन्कम्बन्सी नाही, जे ५० च्या आत राहतील त्यांना ती आहे असे निश्चित केले. काही सर्वेक्षणे आम्ही केली, कार्यकर्ते, नागरिकांची मते जाणून घेतली.  संघ विचार परिवारातील मान्यवरांची मते जाणून घेतली. संघाचा थेट काही रोल नव्हता. 

प्रश्न : निवडणुकीत काका-पुतणे, नातेवाइक, बाप-बेटे यांची गर्दी दिसते, आपला पक्ष तर घराणेशाहीविरुद्ध बोलत आलाय, मग आता तुम्ही तेच करता आहात?
उत्तर : यावेळी कुरुक्षेत्रासारखी लढाई झाली आहे, काही इकडचे तिकडे, तिकडचे इकडे आहेत.   तात्त्विक लढाई नेहमीच असते,  कधीकधी वास्तविकतेचे भान ठेवूनही लढावे लागते. आता महाराष्ट्र राजकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. आजचे राजकारण कायम राहणार नाही.  जिंकलो पाहिजे आणि कालसंगत राहिले पाहिजे यासाठी काही निर्णय करावे लागतात.

प्रश्न: अमित ठाकरेंबाबत आपली भूमिका काय? आपले मत तेच मुख्यमंत्री शिंदेंचेही आहे का? 
उत्तर : माझी भूमिका ही आहे की राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला, मोदीजींना समर्थन दिले, एकही जागा मागितली नाही. आता ते वेगळे लढत आहेत, त्यांची आपली भूमिका आहे, पण त्यांनी मदतीची अपेक्षा अमितसाठी केली आहे तर भाजपची ही भूमिका आहे की मदत केली पाहिजे.  शिंदे यांचेही तेच मत होते, पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे असे मत आहे की, आपण लढलो नाही तर अमितऐवजी उद्धवसेनेच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल. रणनीतीचा गोंधळ (स्ट्रॅटॅजिकल कन्फ्युजन) आहे. मार्ग निघेल.  

प्रश्न : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातच राहणार की केंद्रात जाणार? महायुती जिंकली तर तुम्ही मुख्यमंत्री असाल का?  विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार आणि कोणाचे सरकार येणार हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरेही वेगवेगळी असतील का? २०१९ मध्ये तसे घडले होते म्हणून विचारतोय!
उत्तर : आमच्या पक्षात व्यक्तीचा निर्णय पक्ष घेत असतो. पक्ष म्हणेल तिथे राहील. घरी जायला सांगितले तर घरी जाईन.
(खळाळून हसत) .... यावेळी अशी दोन उत्तरे नसतील. मला वाटते की महाराष्ट्रात बहुमताचेच सरकार येईल आणि ते महायुतीचेच असेल.  क्रॉस अलायन्स सरकार येणार नाही. सरकार स्थापन करायला आम्हाला आमदार कमी पडणार नाहीत. २०१९ मधील प्रयोगाची पुनरावृत्ती होणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा आमचा फॉर्म्युला ठरला आहे. निवडणुकीच्या निकालानंतरच त्याचा निर्णय होईल. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे सांसदीय
मंडळ याबाबत निर्णय करेल.   शिंदे, अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. माझ्या पक्षात मी नाही तर सांसदीय मंडळ निर्णय घेत असते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Sharad Pawar is the father of house breaking: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.