'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:52 AM2024-11-07T08:52:10+5:302024-11-07T09:24:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरी : अलीकडे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. ते सांगतात की, सगळे उद्योग गुजरातला गेले. खरंतर जेवढी परकीय गुंतवणूक भारतात झाली, त्यातील ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे आश्चर्य याचे वाटते की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.६) काळेवाडी फाटा येथील मैदानावर सभा झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, २०१४ला आपले सरकार आले. आमच्या काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी कर्नाटक एक नंबरला गेले. दुसऱ्या वर्षी गुजरात गेले. आम्ही सरकार आल्यानंतर महाराष्ट्राला नंबर एकवर नेऊ, असे २०२३ मध्ये सांगितले होते. आता महाराष्ट्र नंबर एकवर आहे.
याचबरोबर, सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित झाल्या. मात्र, हिंजवडीतील उद्योगांचे स्थलांतर होत आहे, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग बाहेर गेले आहेत. आमच्या काळात उद्योग शहराबाहेर गेले आहेत, ते राज्याबाहेर गेले नाहीत. मात्र त्याबाबत सुप्रिया सुळे विनाकारण फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेते फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक आहेत. आम्ही नवीन योजना आणल्या. त्यातून दहा लाख तरुणांना रोजगार देणार आहोत. २५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. ज्यामध्ये दहा लाख तरुणांसाठी दहा हजार रुपये सरकार खर्च करेल आणि तरुणांना प्रशिक्षण देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचे पोटातील ओठात आले - फडणवीस
आम्ही लाडक्या बहिणींना सत्ता आल्यावर २१०० रुपये देणार आहोत. आम्ही सख्खे भाऊ आहोत, त्यामुळं सावत्र भावांचा याला विरोध आहे. न्यायालयात जाऊन या सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, आम्ही न्यायालयात योग्य पद्धतीने मांडणी केली आणि योजना राबवली. आता तर उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारने लागू केलेल्या योजना बंद पाडणार. याचा अर्थ लाडकी बहीण योजना ते सर्वात आधी बंद करणार. त्यांच्या पोटातील ओठात आले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला.