श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:12 PM2024-09-22T12:12:25+5:302024-09-22T12:13:34+5:30
Maharashtra Assembly Election 2024: नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील उमेदवारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटकपक्ष कंबर कसून तयार आहेत. तसेच विधानसभेची मोर्चेबांधणी आणि जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र काही मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील उमेदवारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.
नगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करत संजय राऊत यांनी येथून पुढचा आमदार हा ठाकरे गटाचाच असेल, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचे एक नेते काल तुमच्या तालुक्यात आले होते. तसेच त्यांनी हे आमचे उमेदवार आहेत, असे जाहीर करून टाकले. अशाप्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असून, शरद पवार यांच्याकडे श्रीगोंद्याबाबत चुकीची माहिती आहे, प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.