"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:16 PM2024-11-05T14:16:09+5:302024-11-05T14:18:03+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच शरद पवार यांनी सूचक विधान करून राजकीय निवृत्तीबाबतचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्यात. तुम्ही मला दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होत असतात. गेल्या वर्षी शरद पवार यांच्या निवृत्तीवरून झालेल्या नाट्यानंतर अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूटही पाडली होती. तसेच संख्याबळाच्या मदतीने पक्षाचं नाव आणि चिन्हही मिळवलं होतं. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच शरद पवार यांनी सूचक विधान करून राजकीय निवृत्तीबाबतचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्यात. तुम्ही मला दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मी सत्तेत नाही, राज्यसभेमध्ये आहे. माझा दीड वर्षाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक आहे. या दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही, याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कसलीच निवडणूल लढणार नाही. किती निवडणुका लढायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्यात. तुम्ही असे लोक आहात की मला एकदाही कधी घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे आणलं पाहिजे. हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे. याचा अर्थ समाजकारण सोडणार नाही. सत्ता नको, मात्र लोकांची सेवा लोकांचं काम करत राहीन, असे शरद पवार यांनी सांगितले.
तत्पूर्वी शरद पवार म्हणाले की, मी तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर विधानसभेत गेलो. राज्यमंत्री झालो. मंत्री झालो. चार वेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रात संरक्षण, शेती खात्यात काम केलं. आज मी राज्यसभेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मी लोकसभेत तुमच्या मतांवर निवडून गेलो. पहिल्यांदा ठरवलं की, आता लोकसभा लढवायची नाही. ३०-३५ वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवीन पिढी तयार केली पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की, मी लोकसभेवर जाणार नाही. इथलं राजकारण मी पाहणार नाही. त्यानंतर ही जबाबदारी मी अजित पवार यांच्यावर सोपवली. तेव्हापासून २०-२५ वर्षे ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पहिली ३० वर्षे माझ्यावर. माझ्यानंतर ३० वर्षे अजित पवार आणि आता पुढच्या ३० वर्षांची तयारी करण्याची आवश्यकता आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची दृष्टी पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्याकडून काही कामं झाली. मी अनेक गोष्टी केल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतमालाच्या निर्यातीसाठी निर्णय घेतले. राज्यातील महिलांना पुरुषांएवढे अधिकार देण्याचा कायदा केला. माझी अशी अपेक्षा होती की, मी इथलं काम सोडल्यानंतर इथल्या ३० वर्षांची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपवलं होतं पाण्याच्या प्रश्नावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता होती. मात्र मी तेव्हा मान्यता मिळवून दिलेली काम पुढच्या पिढीकडून पूर्णत्वास गेली नाहीत. ही कामं पूर्णत्वास नेण्यासाठी आता नव्या पिढीचा प्रतिनिधी गेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.