संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:38 AM2024-11-20T08:38:55+5:302024-11-20T08:41:18+5:30
मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झाला त्यावेळी संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट कारमध्ये होते. वाहनाच्या मागील बाजूने हा हल्ला करण्यात आला असून दगडफेकीमुळे कारची काच फुटली आहे. हल्ल्यानंतर अज्ञातांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचं काम करतायेत असा आरोप केला.
या हल्ल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की, मी आतापर्यंत ३ निवडणूक लढली पण असा प्रकार पाहिला नाही. हा दगड एवढा मोठा होता की दुर्दैवाने काहीही घडू शकलं असते. मी ८ दिवसांपूर्वी पोलिसांना सूचित केले होते. काही लोक नगर, पुणे आणि नाशिकमधून या शहरात आलेत. २ ब्लॅक स्कोर्पिओ विनानंबर प्लेट शहरात फिरतायेत. माझ्या पत्नीच्या वाहनाचा पाठलाग काही दिवसांपूर्वी झाला होता. कार्यकर्त्यांना ओव्हरटेक करून गाड्या जात होत्या. निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्याने अशाप्रकारच्या घटना घडवल्या जात आहे. लोकांनी मतदानाला येऊ नये, मतदान करू नये यासाठी हे सुरू आहे. जर असे काही घडणार असेल तर आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच गुंडांची फौज इथं राजू शिंदे यांनी आणली आहे. मतदारसंघात दहशत निर्माण करून जनतेचे राजे होऊ असं त्यांना वाटते. दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे. मतदार घाबरतील असं त्यांना वाटत आहे परंतु जनता यांची दहशत मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
नेमकी घटना काय?
दरम्यान, या घटनेबाबत सिद्धांत शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. मी घरातून निघाल्यानंतर काही जणांनी माझी गाडी अडवली, तू नीट राहा, जपून राहा असं सांगितले. तुम्ही कोण आहात हे विचारल्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यानंतर तिकडून मी मतदारसंघात चाललो होतो तेव्हा ४ टूव्हिलर आणि २ फोरव्हिलर पाठलाग करत होते. त्यांनी अचानक माझ्या कारवर दगडाने हल्ला केला. मागील काही दिवसांपासून काही गाड्या माझा पाठलाग करत होते. धमकावत होते, कार्यकर्त्यांनाही धमकावलं जात आहे असं सिद्धांत शिरसाट यांनी म्हटलं.